नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण नव्या संसद भवनात आज प्रवेश करण्यात आला. हा देशाच्या राजकीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा क्षण आहे. नव्या संसदेत प्रवेश करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र यांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमधून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देशाचा इतिहास तर सांगितलाच शिवाय येत्या काळात देशाची राजकीय वाटचाल कशी असेल, यावरही महत्वपूर्ण संबोधन केलं. नव्या संसद भवनात प्रवेश केल्यानंतर जुन्या संसदभवनाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असंही त्यांनी आश्वासन दिलं.
जुन्या संसद भवनाची गरिमा कमी होता कामा नये. आता येत्या काळात ही इमारत ‘संविधान सदन’ या नावाने ओळखलं जाईल. कारण येत्या काळात ही इमारत आपल्यासाठी प्रेरणा बनून राहील. जेव्हा या इमारतीला ‘संविधान सदन’ म्हटलं जाईल. संविधानसभेत बसणाऱ्या महापुरुषांना तेव्हा आठवलं जाईल, असं नरेंद्र मोदी म्हणालेत. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी कधीच पक्ष आडवा येत नाही. पण त्यासाठी लोकांसाठी तळमळ पाहिजे. वैश्विक मापदंड आपण ओलांडले पाहिजेत. तेव्हाच आपण स्पर्धा करू शकू. जगात आपल्याला मागे राहायचं नाही. देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
सध्याच्या काळात आत्मनिर्भर भारत हे जगासाठी मोठं आव्हान आहे. जग भारताकडे मोठ्या आशेने सध्या पाहात आहे. आत्मनिर्भर भारताकडे आपली वेगाने वाटचाल सुरू आहे. आंतरराष्ट्रीय खेळांमध्येही आपला तिरंगा अभिमानाने फडकतोय. भारतातील युवक हा जगात पहिल्या रांगेत बसायला हवा, असा आशावाद नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडायची गरज नाही. जल जीवन मिशन, हायड्रोजन धोरण, अशा अनेक योजनांवर वेगाने सध्या काम सुरु आहे. जुन्या संसदेत राष्ट्रध्वज आणि राष्ट्गीताचा स्वीकार झाला. त्याचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आहे. नव्या संसदभवनातही त्यांची गरीमा राखली जाईल. असा विश्वास आहे, असं मोदी म्हणाले.