Sengol : नव्या संसद भवनात ठेवण्यात येणारा सेंगोल नक्की काय आहे?
What is Sengol : चोल साम्राज्याची परंपरा असलेला सेंगोल म्हणजे नक्की काय?; तो संसदेत का ठेवला जातोय?
नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचं 28 मेला उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. या नव्या संसदभवनात एक ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्य आणि चोल सम्राज्याची परंपरा आणि सत्ताहस्तांतराच्या इतिहासाची साक्ष देणारा हा सेंगोलही या नव्या संसदभवनात ठेवण्यात येणार आहे. पण हा सेंगोल म्हणजे नक्की काय? सविस्तरपणे पाहुयात…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेंगोल नव्या संसद भवनात ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
तारीख होती 14 ऑगस्ट. वेळ होती रात्री 10.45 वाजताची. ही वेळ होती इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची. भारताच्या सत्तांतराची… इंग्रजांकडून पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याकडे देशाची सूत्र देण्यात आली. तेव्हा या सत्तांतराचं प्रतिक म्हणून संगोल देण्यात आलं.
सेंगोल म्हणजे राजदंड. सत्ताहस्तांतरावेळी हा राजदंड दिला जायचा. सेंगोल हा राजदंड दक्षिणेतील चोल साम्राज्याच्या परंपरेचं प्रतिक आहे.
पाच फुटांचा हा राजदंड 1947 मध्ये तयार करण्यात आला. हा पूर्णपणे सोन्याचा राजदंड आहे. या सेंगोलच्या मुठीवरती नंदी आहे. तो न्यायचं प्रतिक आहे.
चोल साम्राज्याचा थोडक्यात इतिहास
1300 वर्षे जुनी असलेल्या चोल साम्राज्याच्या परंपरेचा सेंगोल हा महत्वाचा घटक आहे. फक्त भारतच नव्हे तर जगात सर्वाधिक काळ राज्य करणारं साम्राज्य म्हणून चोल साम्राज्याची ओळख आहे. इसवी सन 300 ते 1200 पर्यंत त्यांनी दक्षिण भारतात राज्यकारभार केला. दीर्घकाळ सत्ता गाजवणाचं प्रतिक असणाऱ्या चोल साम्राज्यातील पारंपरिक सेंगोल आता नव्या संसद भवनात ठेवण्यात येणार आहे.
राजकीय अर्थ काय?
चोल राज्यकर्त्यांनी दीर्घकाळापर्यंत दक्षिणेत राज्य केलं. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपला तितकंसं यश मिळताना दिसत नाहीये. नुकतंच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतही याची प्रचिती आली. अशा वेळी दक्षिणेत भाजपला आपला राजकीय विस्तार करायचा असेल तर दक्षिण अस्मितेला जवळ करावं लागेल. त्यामुळे दक्षिणेकडील लोकांच्या अस्मितेला जपण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
शिवाय येणाऱ्या काळात भाजपला आपली सत्ता कायम राखायची आहे. त्यामुळे दीर्घकाळ सत्तेचं प्रतिक असणारं सेंगोल संसदेत ठेवण्यात येणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.