नवी दिल्ली: बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेला नोएडातील (Noida Supertech Twin Towers) 32 मजली आणि 102 मीटर उंच टॉवर्स अखेर आज पडण्यात आला. एपेक्स आणि सेयान हे दोन ट्विन टॉवर ( Twin Towers) तोडण्यापूर्वी आधी सायरन वाजवण्यात आला. तब्बल अर्धा तास या परिसरात सायरन वाजवून हा परिसर निर्मनुष्य झाल्याची खात्री करून घेण्यात आली. संपूर्ण परिसर निर्मनुष्य झाल्यानंतर 3700 किलो स्फोटकांच्या (blast) सहाय्याने हा टॉवर पाडण्यात आला. आधी सायरन वाजवल्यानंतर बरोबर अडीच वाजता धडाम… धडाम… असा आवाज झाला अन् अवघ्या 12 सेकंदात संपूर्ण टॉवर पत्त्याच्या बंगल्यासारखा हा टॉवर कोसळला. हा टॉवर कोसळताना पाहण्यासाठी या परिसरातील इमारतीतील लोक इमारतीच्या टेरेसवर गेले होते. तसेच हा टॉवर कोसळताना पाहण्यासाठी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. टेरेस आणि टॉवर परिसरात जत्रेसारखी गर्दी झाली होती. अनेकांनी तर हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला.
सर्वोच्च न्यायालयाने एपेक्स आणि सेयान हे दोन ट्विन टॉवर पाडण्यास परवानगी दिल्यानंतर पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांनी हा टॉवर पाडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आज दुपारी 2.30 वाजता हा टॉवर पाडण्यात आला. टॉवर पाडण्यासाठी आधी सायरन वाजवण्यात आला. त्यानंतर 3700 किलो स्फोटकांच्या सहाय्याने अवघ्या 12 सेकंदात स्फोट घडवून हा टॉवर पाडला गेला. वॉटर फॉल इम्प्लोजन तंत्राच्या आधारे हा टॉवर पाडला गेला. चेतन दत्ता यांनी रिमोट दाबताच इमारत अवघ्या 12 सेकंदात जमीनदोस्त होऊन धुळीचं साम्राज्य निर्माण झालं.
दोन्ही टॉवरमध्ये 9 हजार 640 ठिकाणी स्फोटके लावण्यात आली होती. त्यानंतर हा स्फोट घडवून आणला. टॉवर पाडण्यापूर्वीच या परिसरातील 5 हजार नागरिकांचं इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं. या परिसरातून भिकाऱ्यांनाही हुसकावून लावण्यात आलं होतं. तसेच या परिसरातील भटकी कुत्री आणि इतर जनावरांनाही इतर ठिकाणी नेण्यात आलं होतं. तसेच टॉवर कोसळल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात अग्निशमन दलाच्या 25 गाड्या आणि 10 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.
देशात पहिल्यांदाच एखादा टॉवर पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा टॉवर पाडण्यासाठी सर्वच खबरदारी घेतली होती. टॉवर पाडण्यासाठी वापरावयाचं तंत्रज्ञान, ढिगारा वाहून नेण्याची व्यवस्था, नागरिकांचं स्थलांतर, इतर इमारतींना होऊ शकणारा संभाव्य धोका, धूळ आणि प्रदूषण त्यामुळे निर्माण होणारी आरोग्य समस्या आदींचा अभ्यास करूनच हा टॉवर पाडण्यात आला. हा गगनचुंबी टॉवर आधुनिक तंत्राच्या सहाय्याने पाडला जाणार असल्याने पहिला सायरन वाजताच आजूबाजूच्या नागरिकांनी आपआपल्या इमारतीच्या टेरेसवर गर्दी केली. टॉवर कोसळताना पाहण्यासाठी ही गर्दी करण्यात आली होती. त्यामुळे जत्रा भरल्यासारखं चित्रं दिसत होतं. तसेच ट्विन टॉवरच्या परिसरातही बघ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांना या लोकांना हुसकावून लावताना नाकीनऊ येत होते.