पेपरलीक, सायबर क्राईम युनिट आणि आता CBI ची एंट्री; NEET नंतर UGC -NET मध्ये एकामागून एक धक्कादायक खुलासे
UGC -NET CBI : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटविषयीचा वाद ताजा असतानाच आता केंद्रीय शिक्षा मंत्रालयाने बुधवारी युजीसी-नेट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. UGC -NET परीक्षेतील पारदर्शकता टिकविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणात आता सीबीआयने एंट्री घेतली आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटविषयी देशभरात मोठे वादंग उठले आहे. त्यातच केंद्रीय शिक्षण खात्याने आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारा आयोजीत युजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्रालयाने प्रकरणातील गडबडीचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. युजीसी नेटचा पेपर फुटल्याच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आला. UGC-NET परीक्षा रद्द झाल्यानंतर विरोधकांनी आता केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पहिल्यांदाच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) 18 जून रोजी पेन अँड पेपर या पद्धतीने आयोजीत करण्यात आली होती. लिखीत स्वरुपाच्या या परीक्षेसाठी 11 लाख इतक्या परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापूर्वी वैद्यकीय पूर्वपरीक्षा नीटमध्ये गडबड झाल्याचा आरोप झाल्यानंतर ती रद्द करण्यात आली होती. आता नेटमधील गडबडीमुळे परीक्षा आयोजीत करणारी एजन्सी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
सायबर गुन्हे पथकाला सूचना
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार 19 जून 2024 रोजी विद्यापीठ अनुदान आयोग, युजीसीला गृह मंत्रालयातंर्गत येणाऱ्या सायबर गुन्हे पथकाने (I4C) या गडबडीविषयीची माहिती दिली. प्राथमिकदृष्ट्या या परीक्षेच्या पारदर्शकता आणि पावित्र्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
पुन्हा नव्याने परीक्षा
युजीसी-नेट जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. आता नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे. लवकरच यासंबंधीची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आल्याचे शिक्षण खात्याने जाहीर केले आहे.
विरोधकांनी केला प्रहार
देशातील महत्वाच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड होत असल्याने देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर सुप्रीम कोर्टाने पण नाराजी व्यक्त केली आहे. आता विरोधकांनी पण सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. परीक्षेवर अनेकदा चर्चा केली, आता NEET परीक्षेवर चर्चा कधी करणार? असा टोला त्यांनी हाणला. तेजस्वी यादव यांनी पण निशाणा साधला.