आता रशियन कंपनी बनविणार 200 वंदेभारत, लावली सर्वात कमी बोली
वंदेभारत गाड्यांच्या निर्मितीसाठी तितागढ - बीएचईएल ( भेल ) कंपनीने दुसरी बोली लावली असून त्यांनी 139.8 कोटीत ही गाडी तयार करण्याची तयारी दाखविली आहे.
नवी दिल्ली : देशात सध्या दहा वंदेभारत ट्रेन सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात देशात 200 वंदेभारत चालविण्याची योजना आहे. या योजनेवर रेल्वे मंत्रालयाचे काम सुरू आहे. अशातच या गाड्यांची निर्मिती आणि देखभालीच्या कामासाठी काढलेल्या निविदांमध्ये रशियाच्या ट्रान्समॅशहोल्डींग ( टीएमएच ) आणि रेल विकास नियम लिमिटेड यांनी संयुक्तपणे 200 लाईटवेट वंदेभारत बनविण्यासाठी सर्वात कमी बोली लावली आहे. देशभरात एकूण चारशे वंदेभारत चालविण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे.
वंदेभारत देशातील दहा मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. परंतू देशातील एकूण चारशे मार्गावर ही गाडी चालविण्याची योजना आहे. सुरूवातीला शंभर मार्गावर ही आलिशान वंदेभारत चालविण्यात येणार आहे. त्यासाठी 58,000 कोटीचे कंत्राट असून त्यात एका वंदेभारत ट्रेनचा निर्मिती खर्च 120 कोटी रूपये गृहीत धरण्यात आला आहे. चेन्नईच्या आयसीएफने ही गाडी 128 कोटी रूपयांत तयार करून दाखविली आहे. दुसरी बोली तितागढ – बीएचईएल ( भेल ) कंपनीने लावली असून त्यांनी 139 .8 कोटी ही गाडी तयार करण्याची तयारी दाखविली आहे. रशियन कंपनी टीएमएच- आरव्हीएनएल यांनी तितागढ- भेल पेक्षा कमी बोली लावली आहे. त्यामुळे रशियन कंपनी भारतात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की भविष्यात रशियन कंपनी या ट्रेनच्या निर्मितीत उतरतील, परंतू याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
58,000 कोटीचे कंत्राट
या दोन कंपन्यांशिवाय फ्रान्स अल्स्टॉम, स्वित्झर्लंडचे रोलिंग स्टॉक निर्माती कंपनी स्टॅडलर तसेच हैदराबाद सर्व्हो ड्राईव्ह यांची संयुक्त कंपनी मेधा-स्टॅडलर तसेच बीईएमएल आणि सिमेन्स यांनी एकत्ररित्या वंदेभारतसाठी बोली लावली आहे. हे कंत्राट एकूण 58,000 कोटीचे असून त्यात 200 वंदेभारतची निर्मिती आणि 35 वर्षांसाठी तिची देखभाल करणे समाविष्ठ आहे.