Driving Test साठी आता RTO त जायची गरज नाही, 1 जूनपासून या नियमात बदलणार
नवीन ड्रायव्हींग लायसन्सचे नियम 1 जूनपासून बदलणार आहे. ड्रायव्हींग लायसन्सची टेस्ट आता RTO कार्यालयात जायची गरजच नाही. तर मग आता ड्रायव्हींग टेस्टसाठी कुठे जायचे ते पाहूयात...
ड्रायव्हींग लायसन्स हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे. यासंदर्भातील नियम येत्या 1 जूनपासून बदलणार आहेत. यापूर्वी ड्रायव्हींग टेस्टसाठी आरटीओच्या पायऱ्या चढाव्या लागायच्या. आता ड्रायव्हींग टेस्टसाठी ड्रायव्हींग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच मोजक्या कागदपत्रांसोबत ही टेस्ट देता येणार आहे. त्यामुळे ही टेस्ट आता तुमच्या नजिकच्या मान्यता प्राप्त ड्रायव्हींग स्कूलमध्ये देता येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या शिफारसी लागू केल्या आहेत. त्यामुळे आरटीओच्या रांगापासून तुमची सुटका होणार आहे.
कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कूलमधून तुम्हाला वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करता येणार आहे. तुम्ही टेस्ट पास झाला आणि परीक्षेत यशस्वी झाला की तुम्हाला या स्कूलमधून प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारावर तुम्हाला वाहनचालक परवाना मिळणार आहे.
या अटी पूर्ण करण्याची गरज
या खाजगी ड्रायव्हींग स्कूलमध्ये दुचाकी, तीन चाकी आणि हलक्या मोटर वाहनासाठी ड्रायव्हींग टेस्टसाठी किमान एक एकर जागा असायला हवी. तर मध्यम आणि अवजड वाहनाच्या टेस्टींगसाठी किमान दोन एकर जागेची गरज लागणार आहे. ट्रेनर 12 वी ग्रेड डिप्लोमा केलेला असावा, त्याला पाच वर्षांचा ड्रायव्हींगचा अनुभव असावा आणि वाहतूक नियमांचा त्याला चांगला अभ्यास असावा. ड्रायव्हींग प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सरकार पुरविणार आहे. हलक्या वजनाच्या वाहन प्रशिक्षणासाठी कमाल चार आठवड्याचा आणि 29 तासांचा अभ्यासक्रम असणार आहे. हे ड्रायव्हींग स्कूल दोन टप्प्यात अभ्यासक्रम शिकविला जाईल.
असा असणार अभ्यासक्रम
पहिले 21 तास बेसिक रोड ड्रायव्हींग, ग्रामीण रोड, महामार्ग, शहर रोड, पार्कींग, रिव्हर्सिंग आणि अपहिल आणि डाऊन हील ड्रायव्हींग, इतर प्रशिक्षण दिले जाईल, 8 तासांचा थिअरी अभ्यासक्रमात ट्रॅफीक प्रशिक्षण, अपघाताच्या कारणांचा अभ्यास, प्रथमोपचार,वाहन चालवितानाची इंधन बचत, वाहतूकीचे नियम आणि अटी आधी शिकविल्या जातील.