जाजपूर : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातानंतर आता जाजपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या ठिकाणी मालगाडीच्या धडकेत चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. या मजुरांनी पावसापासून वाचण्यासाठी मालगाडीखाली जाऊन बसले होते.मात्र अचानक इंजिन नसतानाही गाडी रेल्वे रुळावरुन पुढे सरकल्याने हा अपघात झाला आहे. यावेळी रेल्वेखाली बसलेल्या मजूरांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, अचानक वादळ सुरु झाले होते,त्यावेळी हे मजूर रेल्वे रुळावर काम करत होते. काम करत असताना पाऊस आल्याने थांबलेल्या मालगाडी जाऊन बसण्याचा निर्णय मजूरांनी घेतला होता.
मजूर मालगाडीखाली बसल्यानंतर इंजिन नसलेली मालगाडी अचानक पुढे जाऊ लागल्याने मालगाडीखाली बसलेल्या मजूरांना रेल्वेखालून बाहेरच पडता आले नाही.
त्यामुळे या अपघातात चार मजूरांचा गाडीखाली सापडून जागीच मृत्यू झाला तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. तर आणखी दोन मजूरांचा मृ्त्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ओडिशामध्ये 2 जून रोजी बालासोर येथे रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 100 हून अधिक जखमी झाले आहेत.
बालासोर अपघाताचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे. तर मंगळवारी सीबीआयचे पथक बालासोर आणि बहनगा रेल्वे स्थानकाची दोन वेळा अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात आला आहे. यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सिग्नल रुमची तपासणी केली आहे. अपघातामागील कारण आणि दोषी यावर आता लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.