ओदिशाचा मगजी लाडू ते लाल मुंग्यांच्या चटणीला मिळाला जिओ टॅग, काय असतो जिओ टॅग
महाराष्ट्राच्या सोलापूरच्या चादरीपासून ते रत्नागिरी देवगडच्या हापूस आंब्याला जिओ टॅग मिळाला आहे. हा जिओ टॅग म्हणजे नेमका काय प्रकार असतो...त्याचे महत्व काय ?
ओदिशातील मगजी लाडू खूप प्रसिद्ध आहेत. नासलेले दूध आणि ड्रायफ्रुट्सपासून तयार होणाऱ्या मगजी लाडूला जिओ टॅग ( GI Tag ) मिळाला आहे. याआधी ओदिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासींच्या लाल मुंग्यांच्या चटणीला देखील जिओ टॅग मिळाला आहे. महाराष्ट्रातील देवगडच्या हापूस आंब्यापासून ते सोलापूरच्या चादरीपर्यंत अनेक वस्तूंना जिओ टॅग मिळाला आहे.पंजाबची लस्सी, काश्मीरचे केसर पासून नागपूरची संत्री अशा अनेक वस्तू आणि खाद्य पदार्थांना जिओ टॅग मिळाला आहे. त्यामुळे जिओ टॅग म्हणजे काय ? ते पाहूयात…
एखादा स्थानिक ओळख असलेल्या पदार्थांना आणि वस्तूंना जीआय टॅग दिला जातो. या पदार्थामुळे या क्षेत्राची ओळख बनलेली असते. जेव्हा हे उत्पादन किंवा वस्तू जगभरात प्रसिद्ध होऊ लागते. तेव्हा त्यास प्रमाणित करण्यासाठी एक प्रक्रिया सुरु केली जाते. त्यास जिओ टॅग म्हणजे जीओ ग्राफीकल इंडीकेशन्स म्हटले जाते ( Geographical Indications) या वस्तूच्या वैशिष्ट्यांनूसार भौगोलिक सांकेतिक नावाने ओळखले जाते.
केव्हापासून सुरु झाला GI Tag ?
साल 1999 मध्ये संसदेत उत्पादनाच्या रजिस्ट्रीकरण आणि संरक्षण संदर्भातला कायदा पास करण्यात आला. ज्याला इंग्रजीत Geographical Indications of Goods (Registration and Protection) Act, 1999 असे म्हटले जाते. या अधिनियमाला साल 2003 पासून लागू केला.यानंतरच एखाद्या क्षेत्रातील खास प्रोडक्ट्सला जीआय टॅग देण्यास सुरुवात करण्यात आली. यात शेतसंबंधीचे उत्पादने सामील असतात. हॅण्डीक्राफ्ट्सच्या वस्तू आणि खाद्य पदार्थांना देखील सामील केले जाते.
आतापर्यंत या वस्तूंना मिळाला GI Tag
बनारसची साडी, मध्य प्रदेशातील चंदेरी साडी, महाराष्ट्राच्या सोलापूरच्या चादरी, कर्नाटकातील म्हैसूर सिल्क, तामिळनाडूचे कांचीपुरम सिल्क, उत्तराखंडचे तेजपात, बासमती तांदूळ, दार्जिलिंगचा चहा, तामिळनाडूचा इस्ट इंडिया लेदर, गोव्याची फेणी, उत्तर प्रदेशातील कन्नोजचे अत्तर, आंध्रप्रदेशातील तिरुपतीचा लाडू प्रसाद, राजस्थानची बिकानेरी भूजीया, तेलंगनाच्या हैदराबादचे हलीम, प.बंगालचा रसगुल्ला, मध्यप्रदेशची कडकनाथ कोंबडी, काश्मीरी शाल, कुर्ग येथील मध, कुल्लू येथील चांदी यांना जीआय टॅग मिळाला आहे.
GI टॅगचे वैशिष्ट्ये काय आहे?
जेव्हा एखाद्या वस्तूला GI टॅगचे प्रमाणपत्र मिळते, तेव्हा ती वस्तू किंवा पदार्थाला देशभरात आणि जगात त्या प्रदेशातील वैशिष्ट्ये म्हणून तो पदार्थ ओळखला जाऊ लागतो. मात्र, हा टॅग त्या स्थानिकांना वापरता येतो. हा टॅग 10 वर्षांसाठी उपलब्ध असून ज्याचे नूतनीकरण करावे लागते. GI टॅग मिळाल्याने त्या परिसरातील उत्पादनाला जगात नवीन ओळख मिळून त्याची किंमत वाढून प्रसिद्धी मिळत असते.