ऑलिम्पिक विजेता खेळाडूने घेतली मोठी भूमिका, ‘पद्मश्री’ परत केली, म्हणाला पंतप्रधान तुमची मुलगी…
'मी माझ्या बहिणीसाठी आणि देशाच्या मुलीसाठी पद्मश्री परत करीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी मला तुमच्या मुलीचा आणि माझी बहीण साक्षी मलिकचा अभिमान आहे. पण, मी देशाच्या सर्वोच्च खेळाडूंनाही त्यांचा निर्णय देण्याची विनंती करेन.
नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण शरण सिंह यांचे जवळचे मित्र संजय सिंह यांची निवड झाली. त्यानंतर खेळाडूंमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. भाजप खासदारावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आघाडी उघडली आहे. साक्षी मलिक यांनी खेळातून निवृत्ती घेतली. तर, बजरंग पुनिया यांनी पद्मश्री पुरस्कार परत केला. त्यानंतर आता आणखी एका मोठ्या कुस्तीपटूने मोठी घोषणा केली आहे. गुंगा पहेलवान नावाने प्रसिद्ध असेलेले बॉक्सर वीरेंद्र सिंह यांनीही पद्मश्री परत करण्याची घोषणा केली आहे.
गुंगा पहेलवान या नावाने प्रसिद्ध असलेले कुस्तीपटू वीरेंद्र सिंह यांनी साक्षी मलिकला पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विट करून पद्मश्री परत करत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांनाही टॅग केले आहे. ‘मी माझ्या बहिणीसाठी आणि देशाच्या मुलीसाठी पद्मश्री परत करीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी मला तुमच्या मुलीचा आणि माझी बहीण साक्षी मलिकचा अभिमान आहे. पण, मी देशाच्या सर्वोच्च खेळाडूंनाही त्यांचा निर्णय देण्याची विनंती करेन असे वीरेंद्र सिंह यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शुक्रवारी बजरंग पुनिया यांनी पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला. बजरंग पुनिया यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या नवी दिल्ली येथे पद्मश्री परत केली. यासंदर्भात पुनिया यांनी पीएम मोदी यांना पत्रही लिहिले आहे. बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी ट्विटरवर घोषणा केल्यानंतर ते कर्तव्य पथ येथे पोहोचले आणि हा पुरस्कार परत केला. मात्र, त्यांनी हे पदक रस्त्यावरच सोडून दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
बजरंग पुनिया यांच्या या निर्णयानंतर आता बॉक्सर वीरेंद्र सिंह यांनीही आपला पद्मश्री परत करण्याची घोषणा केली. आमच्या मुलींच्या आई-वडिलांना असा प्रश्न पडला असेल की ऑलिम्पियन खेळाडूंना न्याय मिळत नाही तेव्हा त्यांच्या मुलींचे काय होणार? असे ते ट्विटवर म्हणाले. ऑलिम्पिक पदक विजेत्याला न्याय मिळाला नाही तर आम्हाला कसा मिळणार, अशी चिंता मुलींच्या पालकांना सतावत असेल. असे का झाले याचे उत्तर पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतींनी सर्वांनी येऊन द्यावे. यामुळे न्याय व्यवस्था आणि लोकशाही रचनेवर अनेक प्रश्न निर्माण होतात असेही ते म्हणाले.
गेल्या वर्षी महिला कुस्तीपटूंनी तत्कालीन भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. सुमारे 40 दिवस चाललेल्या या आंदोलनादरम्यान भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकली नाही. न्यायालयाच्या निर्देशानंतर तपास झाला. मात्र, दरम्यानच्या काळात पैलवानांना आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवण्यात आले. देशभरातून या कुस्तीपटूंबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते.
दुसरीकडे, गुरुवारी झालेल्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जवळचे मित्र संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे दुखावलेल्या आंदोलक पैलवानांमध्ये निराशा पसरली. निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने रडत रडत निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, कॉमनवेल्थ आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती विनेश फोगट यांनीही संजय सिंग WFI चे नेतृत्व करत असताना महिला कुस्तीपटूंना त्रास होत राहील असा आरोप केला आहे.