Omicron XBB वाऱ्यासारखा पसरतोय, या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका…
भारतातील अनेक राज्यांमध्ये या प्रकाराचे संक्रमित रुग्णही समोर येत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 18 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
नवी दिल्लीः देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या XBB आणि bf.7 या नवीन उप-प्रकारांमधील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात XBB च्या 70 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. या प्रकारामुळे सिंगापूर, चीन आणि अमेरिकेत कोविडची प्रकरणे वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील XBB स्ट्रेनबाबत धोक्याची सूचना दिली आहे.याबाबत WHO कडून सांगण्यात आले आहे की, या प्रकारामुळे काही देशांमध्ये कोविडची नवीन लाट येण्याची शक्यता आहे.
भारतातील अनेक राज्यांमध्ये या प्रकाराचे संक्रमित रुग्णही समोर येत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 18 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच ओडिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही एक्स बीबीची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की काही महिन्यांत, हा प्रकार ओमिक्रॉनच्या इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरू शकतो.
त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन WHO कडून सर्व देशांना व्हायरस ओळखण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि जीनोम टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की ओमिक्रॉनचे हे नवीन प्रकार वेगाने पसरण्याची शक्यता आहे. परंतु यामुळे कोविड विषाणूची तीव्रता बदलणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणे दिसू शकतात, परंतु वृद्ध आणि जुनाट आजार असलेल्या रुग्णांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
त्याच वेळी, भारतातही एक्सबीबी प्रकारातील रुग्णांमध्ये केवळ सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. ही चार लक्षणे लोकांमध्ये ठळकपणे दिसून येत आहेत.
CDC नुसार, एक्सबीबी प्रकाराची वैशिष्ट्ये सध्या ओमिक्रॉनच्या इतर प्रकारांसारखीच आहेत. यामध्ये खोकला, सर्दी, डोकेदुखी आणि ऐकू कमी येणे आणि सौम्य ताप असणे यांचा समावेश आहे.