विमानात चिमुकल्याला श्वास घेता येईना, देव बनून धावले डॉक्टर
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर 20 मिनिटांना एका बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर विमानातील क्रु मेंबर्सनी विमानात अनाऊन्समेंट केली. सुदैवाने विमानातील दोन डॉक्टरांनी धाव घेतली.
नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांना साक्षात देवच मानले जाते. परंतू एका विमानात छोट्या बाळाला श्वास घेता येईना तेव्हा सुदैवाने विमानात असलेल्या दोघा डॉक्टरांनी उचलेल्या पावलांमुळे बाळाचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे. रांचीहून दिल्ली जाणाऱ्या इंडीगो कंपनीच्या एका विमानात शनिवारी हा बाका प्रसंग घडला. यावेळी विमानातील क्रु मेंबरनी तातडीने पावले उचलली आणि दोघा डॉक्टरांनी बाळाचे प्राण कसे वाचवले ते पाहा…
रांचीहून दिल्ली जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर 20 मिनिटांना एका बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर विमानातील क्रु मेंबर्सनी विमानात अनाऊन्समेंट केली. त्यावेळी सुदैवाने विमानात दोन डॉक्टर प्रवास करीत होते. झारखंडच्या राज्यपालांचे प्रधान सचिव कुलकर्णी आणि सदर हॉस्पिटलचे ( रांची ) डॉ. मोजम्मिल फिरोज हे दोघे बाळाला वाचविण्यासाठी पुढे आले.
या बाळाला हृदय रोगाचा त्रास असल्याचे उघडकीस आले. आयएएस अधिकारी डॉ. नितीन कुलकर्णी हे स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी या बाळाला विमानातील ऑक्सिजन मास्क लावत श्वसनास मदत केली. आणि अन्य औषधे वापरुन ऑक्सिजनचा पुरवठा केला. एक तासानंतर जेव्हा विमान लॅंड झाल्यानंतरही त्या बाळाला आपल्या देखरेखीत ऑक्सिजन सपोर्ट सुरु ठेवला. या मुलाला हृदय रोगाच्या उपचारासाठी त्याचे पालक दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेले जात होते. त्याला जन्मजात हृदयरोगाचा त्रास आहे. या बाळाला पेटेंट डक्टस आर्टेरियोसस ( पीडीए ) या आजाराने पीडीत आहे.
श्वास घेऊ शकत नव्हते
डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की बाळाला श्वास घेता येत नसल्याने त्याची आई रडत होती, श्वास घेण्यासाठी तडफडत होते. आपण आणि डॉ. मोजम्मिल यांनी बाळाची काळजी घेतली. प्रोढ व्यक्तीच्या ऑक्सिजन मास्कचा वापर करीत लहान शिशुला वाचविले. पालकाकडे असलेले औषधे आणि इंजेक्शन देण्यात आल्याने ते फायद्याचे ठरले. त्यानंतर बाळाची लक्षणे सुधारली. स्टेथोस्कोपने हृदयाची स्पंदने मोजण्यात आली. ऑक्सीमीटर नसल्याने ऑक्सीजनचे प्रमाण समजण्यात अडचण आली. सुरुवातीची 15-20 मिनिटे खूपच महत्वाची तणावाची होती. अखेर त्याचे डोळे सामान्य झाले मुलाने आवाजही काढला. केबिन क्रु खूपच सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.