मोठी बातमी : 20 वर्षांपासून फरार, गँगस्टर प्रसाद पुजारी याच्या चीनमधून मुसक्या आवळल्या, देशातील पहिली घटना
एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर राज्य करणारा पुजारी चीनमध्ये जाऊन लपला होता. शेकडो किलोमीटर दूर राहूनही तो देशविरोधी कारवायांमध्ये सामील होता. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
नवी दिल्ली : 2008 पासून चीनमध्ये वास्तव्यास असलेला मुंबईचा कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून भारतात आणण्यात आले आहे. मोस्ट वाँटेड व्यक्तीला चीनमधून भारतात पाठवण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे मुंबईच्या गुन्हे शाखेला फार मोठे यश मिळाले आहे. प्रसाद गेल्या 20 वर्षांपासून फरार होता. इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. प्रसाद पुजारी याच्याविरोधात मुंबईत खून, धमकावणे, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुंड प्रसाद पुजारी याची आई इंदिरा विठ्ठल पुजारी यांनाही खंडणी प्रकरणात अटक केली होती.
मुंबईत एकेकाळी प्रसाद पुजारी यांची खूप मोठी दहशत होती. खून आणि बेकायदेशीर खंडणीचे डझनभर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गुन्हेगारी हाच त्याने आपला व्यवसाय बनवला होता. त्याचे कुटुंबही त्याच्या गैरकृत्यांमध्ये सक्रिय होते. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर राज्य करणारा पुजारी चीनमध्ये जाऊन लपला होता. शेकडो किलोमीटर दूर राहूनही तो देशविरोधी कारवायांमध्ये सामील होता. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
काही वर्षांपूर्वी प्रसाद पुजारी याने शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. 19 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या या हल्ल्यात चंद्रकांत यांचा जीव वाचला होता. 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रसाद पुजारी याची आई इंदिरा यांना खंडणी प्रकरणात अटक केली. 62 वर्षीय इंदिरा आणि सुनील आंगणे, सुकेश कुमार यांच्यावर मुंबईतील एका बिल्डरकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
अनेक कलमान्वये गुन्हा दाखल
प्रसाद पुजारी याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (MCOC) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्र सरकारने मोस्ट वॉन्टेड आरोपींची यादी तयार करून त्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु केली होती. याच मोहिमेत गुंड प्रसाद पुजारी याला चीनमधून मुंबईत आणण्यात आले.
चिनी मुलीशी केले लग्न
भारतीय कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पुजारी याने चीनमध्ये पळ काढला. तिथल्या शेनझेन शहरातील लुओहू जिल्ह्यात त्याने आपले बस्तान बांधले. प्रवासी व्हिसावर पुजारी चीनला गेला होता. त्याची मुदत 2008 मध्येच संपली. मात्र, त्याने मार्च 2008 मध्ये चीनमध्ये तात्पुरता निवासाचा परवाना मिळविला होता. त्याचीही मुदत मार्च 2012 मध्ये संपली. त्यामुळे चीनमध्ये वास्तव्य वाढवून मिळावे यासाठी त्याने एका चिनी मुलीशी विवाह केला. पुजारी याला चार वर्षांचा मुलगाही आहे.