Padma Awards 2023 : आध्यात्मिक गुरु चिन्ना जीयार स्वामी यांना पद्मभूषण
आध्यात्मिक गुरु आणि चिन्ना जीयार स्वामी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. चिन्ना जीयर स्वामी हे भारतीय धार्मिक गुरु आणि तपस्वी आहेत.
मुंबई : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 106 दिग्ग्जांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 91 पद्मश्री, 9 पद्मभूषण आणि 6 जणांची निवड ही पद्मविभूषण पुरस्कारांसाठी केली गेली आहे. यामध्ये आध्यात्मिक गुरु आणि चिन्ना जीयार स्वामी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. चिन्ना जीयर स्वामी हे भारतीय धार्मिक गुरु आणि तपस्वी आहेत. चिन्ना जीयार स्वामी हे वैष्णववादी आध्यात्मिक प्रवचनासाठी लोकप्रिय आहेत. तसेच ते समाजसेवकही आहेत.
चिन्ना जीयार स्वामी यांनी वैष्णव परंपरेचा स्वीकार केला आहे. त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी संन्यास घेण्याची शपथ घेतली होती. तसेच ते 1994 पासून अमेरिका दौरा करत आहेत. चिन्ना जीयार स्वामी यांनी अमेरिकेत असंख्य जणांना शिक्षण दिलं आहे. चिन्ना जीयार स्वामी यांनी लंडन, सिंगापूर, हाँगकाँग, आणि कॅनडा दौराही केला आहे.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
चिन्ना जीयार स्वामी यांनी डिसेंबर 2013 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थ्यांना देशभक्ती आणि भारतीय संस्कृतीबाबत माहिती देत प्रोत्साहित केलं होतं. “देशातील तरुणाला इतिहास माहिती होईल तेव्हाच भारतीय संस्कृतीचा विकास होईल. देशाच्या विकासात विद्यार्थ्यांची निर्णायक भूमिका असते”, असं चिन्ना जीयार स्वामी म्हणाले होते.
चिन्ना जीयार स्वामी यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1956 साली आंधप्रदेशमधील राजमुंदरी इथे झाला होता. त्यांचे आजोबा हे त्रिदंडी श्रीमन्नारायण रामानुज जीयार हे होते.
समाजसेवेत आघाडीवर
चिन्ना जीयार स्वामी यांनी विद्यार्थ्यांना वैदिक परंपरेची माहिती व्हावी, यासाठी मोठं पाउल उचलंल. चिन्ना जीयर स्वामी यांनी हैदराबाद, चेन्नई आणि अमेरिकेत जीयर एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली. चिन्ना जीयार स्वामी यांनी सुरु केलेल्या शाळा या सर्वांसाठी खुल्या आहेत. चिन्ना जीयार स्वामी यांना अनेक भाषा अवगत आहेत. सर्वसामांन्यांना समजेल अशा शब्दात प्रवचन देण्यात त्यांचा हातखंडा आहे.