Pakistan Political Crisis : इम्रानचा पायउतार, शाहबाजचे आगमन, वाचा पाकिस्तानमधील राजकीय नाटकाची महिनाभराची कथा
'नया पाकिस्तान'(Pakistan) चे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले इम्रान खान (Imran Khan) यांचा पायउतार झाला आहे. 'जुन्या पाकिस्तान'चा पुरस्कार करणारे सत्तेवर आले आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील. कालपर्यंत शाहबाज पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते.
नवी दिल्ली – ‘नया पाकिस्तान'(Pakistan) चे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले इम्रान खान (Imran Khan) यांचा पायउतार झाला आहे. ‘जुन्या पाकिस्तान’चा पुरस्कार करणारे सत्तेवर आले आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील. कालपर्यंत शाहबाज पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते. पण आजपासून त्यांना ‘वझीर-ए-आझम’ म्हटले जाईल. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान यांनी ‘नया पाकिस्तान’ निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी नया पाकिस्तान विरुद्ध जुना पाकिस्तान अशी चर्चा होती. रविवारी अविश्वास प्रस्तावामुळे इम्रान सरकार पडले. तेव्हा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) नेते बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले, ‘जुन्या पाकिस्तानात आपले स्वागत आहे.
शाहबाज शरीफचं आगमन हे नाटकापेक्षा कमी नव्हतं
इम्रानचं पाकिस्तानच्या सत्तेतून बाहेर पडणं आणि शाहबाज शरीफचं आगमन हे नाटकापेक्षा कमी नव्हतं. महिनाभर पाकिस्तानचे राजकीय नाट्य संपूर्ण जगाने उगड्या डोळ्यांनी पाहिले. पण इम्रान खान यांना सत्तेवरून खाली खेचण्याची करण्याची तयारी खूप आधीपासून सुरू होती. 5 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे बिलावल भुट्टो झरदारी आणि त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ यांची भेट घेतली. या बैठकीत इम्रान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) आणि जमियत उलेमा-ए-फझल (जेयूआय-एफ) चे प्रमुख मौलाना फजल-उर-रहमान यांच्याशी बोलले आणि त्यांच्यासोबत गेले.
पाकिस्तानच्या राजकारणात महिनाभरात काय घडले?
- ८ मार्च : विरोधकांनी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या अविश्वास प्रस्तावाला माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन, बिलावल भुट्टो यांचा पक्ष पीपीपी आणि मौलाना फजलुर रहमान यांचा पक्ष जेयूआय-एफ यांनी पाठिंबा दिला होता.
- 27 मार्च : इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये एका मोठ्या रॅलीला संबोधित केले. या रॅलीत इम्रान खान यांनी आपल्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावामागे ‘परकीय षडयंत्र’ असल्याचा दावा करणारे पत्र दाखवले.
- 31 मार्च : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार होती, मात्र कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले.
- 3 एप्रिल : अविश्वास ठरावावर मतदान होणार होते. मतदानापूर्वीच उपसभापती कासिम सूरी यांनी ते फेटाळून लावले. यानंतर इम्रान खान यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी नॅशनल असेंब्ली बरखास्त केली. या संपूर्ण राजकीय संकटाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली.
- ७ एप्रिल : सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने उपसभापतींचा निर्णय ‘असंवैधानिक’ असल्याचे म्हटले आहे. यासोबतच पंतप्रधानांच्या शिफारशीवरून सभागृह बरखास्त करण्याचा राष्ट्रपतींचा निर्णयही असंवैधानिक असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ एप्रिल रोजी अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश दिले.
- 9 एप्रिल : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संसदेचे कामकाज झाले. त्या दिवशीही बरेच राजकीय नाट्य घडले होते. अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष असद कैसर यांनी राजीनामा दिला. रात्री उशिरा अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले. त्यात 174 मते पडली आणि इम्रान यांचे सरकार पडले.
- 11 एप्रिल : इम्रान सरकार पडल्यानंतर नवीन पंतप्रधान निवडीसाठी संसदेचे कामकाज सुरू झाले. इम्रान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या सर्व खासदारांनी राजीनामा देऊन पंतप्रधानपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. शाहबाज शरीफ यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली.
आता पुढे काय होणार ?
शाहबाज घेणार पंतप्रधानपदाची शपथ : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ 174 मते पडली आहेत. रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. इम्रान यांच्या पक्षाच्या खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. पाकिस्तानी मीडियाच्या बातम्यानुसार रविवारी पीएमएल-एन आणि पीपीपीच्या नेत्यांची बैठक झाली.त्यामध्ये पीटीआयच्या खासदारांनी राजीनामा दिल्यास त्यातून रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.