नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय पातळीवरही हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकारला आता नैतिक अधिकार उरला नसल्याचा घणाघात प्रसाद यांनी केलाय.(Ravi Shankar Prasad criticizes CM Uddhav Thackeray and Sharad Pawar after Parambir Singh’s allegations against Anil Deshmukh)
“महाराष्ट्रात वसुलीची महाआघाडी आहे. हे प्रकरण केवळ एका मंत्र्यांचं नाही, तर उद्धव ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. या सरकारनं नैतिक अधिकार गमावला आहे”, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केलाय. प्रसाद यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केलीय. उद्धव ठाकरे यांची शांती काय सांगते? शरद पवार यांच्या शांत राहण्यामुळेही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विधानसभा आणि बाहेरही मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे यांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचंही प्रसाद यांनी म्हटलंय.
सचिन वाझे हे अस्टिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. यात मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्तांची भूमिकाही असू शकते, अशी शंका प्रसाद यांनी उपस्थित केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करायला सांगतात. मग सचिन वाझेकडून अजून कोणती घाणेरडी कामं केली गेली? असा सवाल प्रसाद यांनी विचारलाय. त्याचबरोबर शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत, असंही प्रसाद म्हणाले. सचिन वाझे अनेक वर्षे निलंबित होता. कोरोना काळात त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आलं. आता शिवसेना सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रसाद यांनी केलाय.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राजीनामा घ्यायचा की नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तेच याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले.
संबंधित बातमी :
फडणवीस आणि परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यावर महाराष्ट्रात लेटर बॉम्ब: शरद पवार
गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का?; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल
Ravi Shankar Prasad criticizes CM Uddhav Thackeray and Sharad Pawar after Parambir Singh’s allegations against Anil Deshmukh