तलाठी आप्पाने 5 हजाराच्या नोटा गिळून टाकल्या, यानंतर जे झालं ते आणखी भयानकच…
जमीनीच्या एका प्रकरणात तलाठ्याने फिर्यादीकडून पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. फिर्यादीने यासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रारही केली होती. त्यानंतर लोकायुक्तांची टीम घटनास्थळी पोहोचली असता.....
भोपाळ | 25 जुलै 2023 : आत्तापर्यंत एखाद्या व्यक्तीने लाच खाल्ली, असं आपण ऐकलं असेल , पण मध्य प्रदेशमध्ये एका इसमाने त्याला मिळालेली लाच खरोखर गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात ही अजब-गजब घटना घडली आहे. तेथे एका तलाठ्याने लाचेपोटी मिळालेल्या रकमेच्या नोटा (patwari swallod money) खरोखर चावून गिळल्याचे समोर आले आहे. या तलाठ्याला लोकायुक्त टीमने लाच (bribe) घेताना पकडले होते. मात्र त्याने स्वत:ला वाचवण्याच्या नादात लाचेची रक्कम चावून गिळून टाकली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
रंगेहात पकडल्यावर त्याने गिळले 5 हजार रुपये
बिलहरी येथील तलाठी गजेंद्र सिंह यांनी जमीनीच्या एका प्रकरणात फिर्यादी चंदन सिंह लोधी यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. जबलपूरमधील लोकायुक्तांकडे चंदन सिंह लोधी यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानंतर लोकायुक्तांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तलाठी गजेंद्र सिंह यांना लाच घेताना रंगेहात पकडले. पण गजेंद्र यांनी चपळाईने लाचेपोटी मिळालेली रक्कम, 500- 500 च्या 9 च्या तोंडात टाकल्या व त्या चावून गिळल्या.
यादरम्यान लोकायुक्तांच्या 7 सदस्यांच्या टीमने त्यांच्या तोंडातील नोटा काढून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तोंडातून पैसे न निघाल्याने गजेंद्र सिंह यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अथक परिश्रमानंतर तलाठी गजेंद्र सिंग याने चावलेल्या नोटा बाहेर काढण्यात आल्या. ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
व्हॉईस रेकॉर्डिंगच्या व इतर पुराव्यांच्या आधारे होणार कारवाई
तक्रारदार चंदन लोधी यांच्या तक्रारीवरून लाच घेणारा तलाठी गजेंद्र सिंग याला 5 हजार रुपयांसह पकडण्यात आले. मात्र त्यांनी लाचेची रक्कम गिळून टाकली, असे लोकायुक्त टीमचे नेतृत्व करणारे कमलसिंग यांनी सांगितले. पण, टीमकडे व्हॉईस रेकॉर्डिंगसह इतर पुरावे आहेत, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल. सध्या आरोपी गजेंद्र सिंह याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई सुरू आहे.