आईच्या त्या गोष्टींनी पंतप्रधान मोदी भावुक, लेक्स फ्रिडमॅनसोबतच्या पॉडकास्टमध्ये उघडली अनुभवाची शिदोरी
PM Modi Lex Fridman Podcast : AI रिसर्चर आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध विषयावर खुलवलं. मोदींचे विविध विषयावरील विचार थेट जगाने ऐकले. आईचा विषय निघाला त्यावेळी त्यांच्या मनात आठवणी दाटल्या. काय म्हणाले पंतप्रधान?

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत तीन तासांची आहे. पंतप्रधानांनी एखाद्या परदेशी खासगी माध्यमाला दिलेली ही पहिलीच प्रदीर्घ मुलाखत म्हणावी लागेल. फ्रिडमॅन यांनी मोदींना विविध विषयावर खुलवले. पण आईच्या आठवणीच्या वळणावर या मुलाखतीला एक मर्म मिळाले. एक चिंतन मिळाले. मोदी हे लोकप्रिय व्यक्तिमत्व घडण्यामागील प्रेरणा समोर आली. आईच्या शिकवणीची शिदोरी हीच त्यांच्यासाठी मोठा अनुभव ठरली. काय म्हणाले मोदी?
हे जीवन तर त्यांच्याचमुळे
‘आज माझे आयुष्य, जीवन जे काही आहे, ते केवळ आई, वडील आणि माझ्या गुरूजनांमुळे आहे.’ अशी प्रांजळ कबुली मोदींनी दिली. “लहानपणी आम्हा सर्व भावंडांना लवकर उठावे लागत असे. माझी आई सर्वांची काळजी घ्यायची. समाजाविषयी तिचा विशेष सेवाभाव होता. त्यावेळचे अनुभव आजही मला प्रेरित करतात. समाजाविषयी सहानुभूती, दुसऱ्याचे भले करण्याची इच्छा, हे सर्व मूल्य, गुण मला माझ्या कुटुंबाकडून मिळाले आहे. मला वाटते माझे जीवन हे आई-वडील आणि शिक्षकांच्या, त्या योग्य वातावरणामुळे खऱ्या अर्थाने पोषित झाले आहे.” असे अनुभवकथन मोदींनी केले.




प्रेमरूप वात्सल्यमूर्त आई
पंतप्रधान मोदी यांनी या पॉडकास्टमध्ये त्यांचे बालपण आठवले. आम्ही निश्चिंतपणे जगलो, आमच्याकडे जे काही होते, त्यातच आम्ही आनंद मानला. आम्ही कष्ट उपसले. जी परिस्थिती आहे, तिच्यात आम्ही सुख मानले. त्याविषयी कधी तक्रार केली नाही. माझे नशीब, दुर्दैव म्हणा एकामागून एक काही घटना घडल्या. पुढे राजकारणात यावे लागले. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा माध्यमं माझ्या गावी पोहचली. त्यांनी माझ्या गावात माझी विचारपूस केली. माझी आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती याविषयी माहिती घेतली. पण खूप कमी लोक मला ओळखत होती. नेहमी दुसऱ्याचं भलं करायची हा माझ्या आईचा अंगभूत गुण होता. तिला घरगुती उपचारांची माहिती होती. ती त्या आधारे मुलांवर उपचार करायची. सूर्य नारायण उगवण्याच्या आधीच लोकांची भल्या पहाटे पाच वाजेपासून आमच्या घरी या उपचारासाठी येणे जाणे होते. त्यामुळे गावातील अनेक माणसं आमच्या घरी जमायची. पण या धामधुमीमुळे आम्हाला लवकर उठावे लागायचे असे हसत हसत मोदींनी सांगितले.
स्वामी विवेकानंद यांचा खोलवर प्रभाव
लहानपण ग्रंथालयात जाण्याची आठवण त्यांनी जागवली. त्यावेळी आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी वाचन केल्याचे ते म्हणाले. त्यांच्या विचारांचा मोठा खोलवर परिणाम आपल्यावर झाल्याचे ते म्हणाले. मनुष्याला खरं समाधान वैयक्तिक लाभापेक्षा दुसऱ्याला केलेल्या निस्वार्थ सेवेतून मिळते हे विवेकानंद यांच्यामुळे कळाल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याशीसंबंधीत एक घटना यावेळी सांगितली. विवेकानंद यांची आई आजारी पडल्याने त्यांनी गुरूकडे मदत मागितली. त्यावेळी रामकृष्ण यांनी त्यांना कालीमातेकडे प्रार्थना करण्यास सांगितले. काली मातेकडे प्रार्थना केली. त्यावेळी ते काहीच मागू शकले नाही. या परमशक्तीने अगोदरच इतके दिले आहे, तिच्याकडे अजून काय मागणार असा अनुभव त्यांना झाला आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचा बोध विवेकानंदांना झाल्याचे कथन मोदी यांनी केले.