100 दिवसात एक दोन नाही, अनेक धाडसी निर्णय; त्यामुळे लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला चार चांद
PM Narendra Modi 74th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. मोदी सरकारला केंद्रात सत्ता हाती घेऊन 100 दिवस पूर्ण होत आहे. या काळात या सरकारने धाडसी निर्णय घेतले. त्याचे जनतेला अल्पकालीन आणि दीर्घकालीन फायदे होतील.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. त्यांनी ओडिशात अनोख्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवशी मोदी 3.0 सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. या काळात या सरकारने लोकाभिमुख अनेक कामे केली. कल्याणकारी योजनांमुळे जनतेला अल्पकालीन आणि दीर्घकालीन फायदे होतील. 2047 पर्यंत विकसीत भारताचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट या सरकारने समोर ठेवले आहे. त्यासाठी अनेक धाडसी निर्णय हे सरकार घेत आहे.
मोदी 3.0 सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता, या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील रोडमॅप पूर्वीपासूनच तयार असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने त्याची तयारी केली होती. भाजपा सरकारच्या या कार्यकाळात शेतकरी आणि पायाभूत विकासाला प्राथमिकता देण्यात आल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने केंद्र सरकारने मोठे आणि महत्वाचे निर्णय घेतल्याचे दिसून येते. त्यासाठी गेल्या काही महिन्यात कष्ट घेतल्याचे दिसून येते. मोदी सरकारने महिला, तरुण, अनुसूचित जाती-जमातीपासून ते प्रत्येक वर्गासाठी योजना तयार केल्या आहेत. लोकाधार आणखी मजबूत होण्यासाठी लोकाभिमुख योजनांवर हे सरकार भर देत आहे.
100 दिवसांचा रोडमॅप
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उतरण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसोबत तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवसांचा रोडमॅप तयार केला होता. तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची चुणूक आणि आत्मविश्वास त्यांनी या कृतीतून दाखवून दिला होता. त्यामुळे 9 जून, 2024 रोजी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा जवळपास सर्वच मंत्रालयांचे 100 दिवसांचे काम कितीतरी दिवस अगोदरच सुरू झालेले होते. तिसऱ्या कार्यकाळातील पहिलाच दिलासादायक निर्णय त्यांनी घेतला. पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. ही रक्कम जवळपास 20,000 कोटी रुपये होती. त्यानंतर MSP वृद्धी करणे, डिजिटल कृषी मिशनसह अनेक गेमचेंजर निर्णय मोदी सरकारने घेतले.
गेमचेंजर योजनांचा श्रीगणेशा
1. इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी केंद्र सरकारने 3 लाख कोटी रुपयांच्या योजनांना मंजूरी दिली. त्यात रस्ते, रेल्वे, बंदरे आणि विमानतळ विकास, आठ द्रुतगती रस्ता कॉरिडोर यांचा समावेश आहे.
2.सामाजिक कल्याण धोरणातंर्गत पीएम जनमन योजना सुरु करण्यात आली.
3.वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन आणि संरक्षणासाठी, विवाद निराकरणासाठी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत सादर करण्यात आले आहे.
4. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेतंर्गत प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याची सुविधा देण्यात आली आहे.
5. तरुणांसाठी कौशल्य विकास मिशन सुरु करण्यात आले आहे. त्यातंर्गत 4.1 कोटी तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी अर्थसंकल्पात 2 लाख कोटी रुपयांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
6. मोठ्या 500 कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप, 28,600 कोटी गुंतवणुकीसह 12 औद्योगिक नोड्सला मान्यता आणि 10,600 कोटी रुपयांची विज्ञान धारा योजना असे वेगळे निर्णय मोदी सरकारने घेतले आहे.