पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. आज त्यांनी ओडिशा राज्याचा दौरा केला. भुवनेश्वर येथे त्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या एका लाभार्थ्याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. ते लाभार्थी कुटुंबाच्या गृह प्रवेशाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी पंतप्रधानांनी खीरीवर ताव मारला. तर बालगोपाळांसोबत त्यांनी गप्पा ही मारल्या. त्यांच्या आनंदात ते सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाला भुवनेश्वर येथे 1 कोटी महिलांना मोठी भेट दिली. त्यांनी सुभद्रा योजनेचा शुभारंभ केला.
काय आहे सुभद्रा योजना
या योजनेतंर्गत 21 ते 60 वर्षाच्या जवळपास 1 कोटी महिलांना पुढील पाच वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षाला 10,000 रुपयांची मदत देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक महिलेला एकूण 50,000 रुपयांची सहाय करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी 10,000 रुपये रक्षाबंधन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस या दोन हप्त्यात देण्यात येणार आहे.
खीरीवर मारला ताव
पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात एका लाभार्थी कुटुंबाच्या घरी पोहचले. पंतप्रधान आवास योजनेत त्यांनी या घराचे उद्धघाटन केले. ते या घरात सुद्धा गेले. त्यावेळी लाभार्थ्याच्या सुनेने त्यांच्यासाठी खीर तयार करुन दिली. या आदिवासी कुटुंबाने मला खीर खाऊ घातली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण कधी विसरू शकणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
सुभद्रा योजनेची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले की, गेल्या 100 दिवसांत 11 लाख नवीन लखपती दीदी तयार झाल्या आहेत. भाजपच्या नवीन सरकारने आता आई आणि बहिणींसाठी सुभद्रा योजना सुरु केल्याचे ते म्हणाले. या योजनेतंर्गत महिलांना 50 हजार रुपयांची एकूण राशी देण्यात येणार आहे. त्याची रक्कम वेळोवेळी महिलांना देण्यात येईल. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे आरबीआयच्या डिजिटल करन्सी पायलट प्रकल्पाशी ही योजना जोडण्यात येणार आहे. काही दिवसांनी या योजनेतील महिला डिजिटल स्वरुपात त्यांचा पैसा वापरू शकतील.
30 लाख कुटुंबाचा गृह प्रवेश
महिला सशक्तीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून छोट्या छोट्या गावातही आता महिलांच्या नावे घर होत आहे. आतापर्यंत 30 लाख कुटुंबाचा गृहप्रवेश झाल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत 10 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.