‘उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबतची मैत्री तोडली’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीएच्या बैठकीत मोठं वक्तव्य
एनडीएच्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एनडीए किती मजबूत आहे याचे दाखले देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला.
नवी दिल्ली | 8 ऑगस्ट 2023 : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एनडीएच्या खासदारांची आज अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीनंतर जेवणाची देखील खास व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी पुरणपोळी, पिठलं भाकरी यांची विशेष मेजवानी ठेवण्यात आली होती. दरम्यान, एनडीएच्या पार पडलेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख करत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना विषयी केलेल्या वक्तव्यांना काही राजकीय कंगोरे जरुर असण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या वर्षात देशात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली होती आणि त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली होती. उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडण्यामागे ‘मातोश्री’ येथे बंद दाराआड घडलेल्या बैठकीचं कारण शिवेसेनकडून सांगण्यात आलं होतं. अमित शाह, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा शिवसेनेकडून केला जात होता. यावरुन वाद निर्माण झाला होता. दोन्हीकडून वेगवगळे दावे सातत्याने गेल्या तीन वर्षांपासून केले जात आहेत. असं असताना आजच्या एनडीच्या बैठकीतही मोदींनी शिवसेनेचा उल्लेख केला.
एनडीएची युती गेल्या 25 वर्षांपासून कशी मजबूत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींकडून करण्यात आला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीमंत्री ममता बॅनर्जी, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची उदाहरणे दिली. हे नेते एकेकाळी एनडीएसोबत होते. पण ते आता एनडीएपासून दूर गेले. त्यांना आम्ही दूर केले नाही. तर ते स्वत:हून दूर गेले. हे सांगत असतानाच त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे आणि आमची युती ही खूप मजबूत होती. पण आम्ही त्यांना दूर केलं नाही तर ते आमच्यापासून दूर गेले, असं मोदी बैठकीत म्हणाले.
नरेंद्र मोदी शिवसेनाबद्दल काय म्हणाले?
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिवसेनेचा उल्लेख करण्यात आलाय. “शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी असलेली युती तोडली. आम्ही तोडली नाही”, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी बैठकीत केलं. विशेष म्हणजे या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा दाखला दिला. त्यांनी एनडीएच्या खासदारांसमोर हा दाखला दिला. यावेळी त्यांनी खासदारांना यापुढेही एनडीए म्हणून कायम राहण्याचं आवाहन केलं. “काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही. त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही”, असंही मोदी या बैठकीत म्हणाले.
पंतप्रधानांकडून ‘सामना’ वृत्तपत्राचाही उल्लेख
नरेंद्र मोदी यांच्याकडून यावेळी सामना वृत्तपत्राचादेखील दाखला देण्यात आला. 2014 पासून शिवसेना एनडीएसोबत सत्तेत असतानाही ‘सामना’मधून वारंवार टीका केली जात होती. मात्र आम्ही त्यांना प्रतिउत्तर दिलं नाही, असं पंतप्रधान बैठकीत म्हणाले. दरम्यान, या बैठकीत मोदींनी खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या.