Loksabha speaker election : तरूण खासदारांना ओम बिर्लांकडून खूप शिकायला मिळेल , पंतप्रधान मोदींकडून लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन
Lok Sabha Speaker Election 2024 : 1976 नंतर देशात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. ओम बिर्ला यांनी निवडणुकीत बाजी मारली. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड एक ऐतिहासिक क्षण आहे.
ओम बिर्ला यांनी नवा इतिहास रचला आहे. तरूण खासदारांना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आज निवड झाली. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिल्याने त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं. मात्र आवश्यक संख्याबळ नव्हते, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण भाजपाकडून सलग दुसऱ्यांदा एकाच व्यक्तीची स्पीकरपदी निवड होण्याची ही पहिली वेळ आहे.
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केलं. ‘ तुम्ही दुसऱ्यांदा या आसनावर विराजमान झालात, हे या सभागृहाचे भाग्य आहे. मी तुमचे आणि संपूर्ण सभागृहाचे अभिनंदन करतो. ओम बिर्ला यांची कार्यशैली तरुण खासदारांना प्रेरणा देईल. आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला पुढील पाच वर्षांसाठी मार्गदर्शन कराल आणि सत्र सुरळीतपणे चालवण्यास मदत कराल.’ असे ते म्हणाले.
‘ 18 व्या लोकसभेत तुम्ही दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. हा एक नवा विक्रमच आहे. श्री बलराम जाखड हे पहिले सभापती होते ज्यांना 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सभापती होण्याची संधी मिळाली. त्यांच्यानंतर तुम्हाला ही संधी मिळाली आहे. जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा या पदावर राहण्याची संधी मिळाली आहे. खासदार म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ते जाणून घेण्यासारखे आहे, तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी बिर्ला यांचे कौतुक केले.
राहुल गांधींनीही दिल्या शुभेच्छा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्ष हा भारताचा आवाज आहे. मला आशा आहे की तुम्ही आम्हाला आमचा आवाज उठवू द्याल ( म्हणणे मांडू द्याल.) विरोधकांचा आवाज दाबणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यांचा आवनाज दाबून संसदेचे कामकाज चालू शकत नाही. विरोधकांना सरकारला सहकार्य करायचे आहे. आम्हालाही बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.