लखनऊ: कल्याण सिंह यांच्या निधनामुळे आपण देशातील एक सामर्थ्यवान नेता गमावला आहे. मी प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करतो की, त्यांनी कल्याण सिंह यांना आपल्या चरणांपाशी स्थान द्यावे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.उत्तर प्रदेशचे माजी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री लखनऊ येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले.
त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी लखनऊ येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, कल्याण सिंह यांना अपेक्षित असलेली मूल्य आणि संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्नांमध्ये कोणतीही कसूर ठेवता कामा नये. भारतीय परंपरा आणि संस्कृतीवर श्रद्धा असणाऱ्यांसाठी कल्याण सिंह यांचे निधन हा एक मोठा धक्का आहे. देव या लोकांना आणि कल्याण सिंह यांच्या कुटुंबीयांना अशा कठीण परिस्थितीत बळ देवो, अशी प्रार्थना पंतप्रधान मोदी यांनी केली.
#WATCH | Lucknow: PM Narendra Modi speaks on the demise of former UP CM Kalyan Singh. He says, “We have lost a capable leader. We should make maximum efforts by taking his values & resolutions to compensate for him; we should leave no stone unturned in fulfilling his dreams….” pic.twitter.com/I61qz8H0Yx
— ANI (@ANI) August 22, 2021
कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री लखनऊच्या संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. आज सकाळपासून कल्याण सिंह यांचा रक्तदाब कमी होत होता. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं शनिवारी निधन झालं.
कल्याण सिंह यांना भाजपचे उत्तर प्रदेशातील हिंदूहृदय सम्राट म्हणून ओळखले जाते. हजारो कारसेवकांनी जेव्हा बाबरी मशिदीची इमारत पाडली तेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मात्र, मशीद पाडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी पदाचा राजीनामा दिला होता. सिंह यांनी 6 डिसेंबरच्या मेळाव्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सादर केले होते, त्यात असे म्हटले होते की, मशीदीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, आमचं सरकार मशिदीची पूर्ण काळजी घेईल. तथापि, तसे होऊ शकले नाही. असे म्हटले जाते की, बाबरी विध्वंस प्रकरणात कल्याणसिंह यांची पडद्यामागे मोठी भूमिका होती आणि सर्व काही त्यांच्या संमतीने घडत होते. कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, परंतु या प्रकरणामुळे ते भाजपच्या सक्रीय राजकारणापासून दूर फेकले गेले. भाजपच्या या ‘हिंदूहृदय सम्राटा’ने यूपीमध्ये पक्षाला मोठी ओळख मिळवून दिली होती. पुढे पक्षाने त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते.