नवी दिल्ली: चार राज्यातील निवडणुकीत भाजपला (bjp) दणदणीत यश मिळालं आहे. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा देशभर जल्लोष पाहायला मिळत आहे. लोकसभेतही (loksabha) या जल्लोषाची एक झलक पाहायला मिळाली. आज संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) लोकसभेत आले. मोदी लोकसभेत येताच भाजप नेते अमित शहा, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे सर्वच खासदार उभे राहिले. या खासदारांनी मोदींचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतानाच ‘मोदी… मोदी’चे नारे लगावले. यावेळी ‘भारत माता की जय’च्याही घोषणा देण्यात आल्या. मोदी आसनावर बसल्यानंतरही भाजप खासदारांकडून बाके वाजवत मोदी मोदीच्या घोषणा दिल्या जात होत्या. बराचवेळ संपूर्ण सभागृहात या घोषणा सुरू होत्या. त्यामुळे सभागृहाचं कामकाज काहीकाळ थांबलं होतं.
चार राज्यांच्या विधानसभा निकालानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आले. पाच राज्यांपैकी भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत आले. यावेळी सभागृहात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर विरोधी पक्षनेते उपस्थित होते. मोदी आल्यानंतर सर्वच खासदार उठून उभे राहिले. भाजपच्या खासदारांनी मोदींचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. त्यानंतर मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. यावेळी मोदींनी सर्वांना अभिवादन केले आणि आपल्या स्थानावर बसले. त्यानंतरही मोदी मोदी आणि वंदे मातरमचा गजर सुरूच होता. बराच काळ सभागृहात या घोषणा सुरू होत्या.
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला हे ऑस्ट्रेलियाच्या एका शिष्टमंडळा विषयी बोलत होते. हे शिष्टमंडळ सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी आलं होतं. त्याचवेळी मोदींनी सभागृहात प्रवेश केला. मोदींचं अशा पद्धतीचं झालेलं स्वागत पाहून हे शिष्टमंडळही अवाक् झालं.
13 मार्च रोजी हे ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळ भारतात आलं आहे. त्याआधी या शिष्टमंडळाने आग्र्याचा दौरा केला. 17 मार्च रोजी हे शिष्टमंडळ हैदराबादलाही गेलं होतं. आज या शिष्टमंडळाने लोकसभेचं कामकाज पाहिलं.
संबंधित बातम्या:
गोवा भाजपमध्ये सुंदोपसुंदी; मुख्यमंत्री सावंतांविरोधात आमदार राणेंनी थोपटले दंड, प्रकरण काय?