कोण म्हणतं नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार? खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच स्तुतीसुमनं
ठाकरे गटाचे नेते आणि नारायण राणे यांचे कट्टर शत्रू वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असा दावा महिनाभरापूर्वीच केला होता.
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेले नारायण राणे (Narayan Rane) सध्या भाजपचे नेते आणि केंद्रात मंत्रिपदी आहेत. मात्र भाजपने काही मंत्र्यांची लीस्ट तयार केली असून त्यांची लवकरच मंत्रिपदावरून गच्छंती होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे नारायण राणे यांचं नावही या ब्लॅकलिस्टमध्ये असल्याचं सांगण्यात येत होतं. ठाकरे यांच्या शिवसेना नेत्यांनी तर नारायण राणेंचं मंत्रिपद कधीही जाऊ शकतं, असे दावे केलेत. मात्र या शक्यता फेटाळून लावणारी घटना घडली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नारायण राणे यांचं कौतुक केलंय. स्थानिक पातळीवरील संघर्षातून उभा राहिलेला नेता, अशा शब्दात मोदी यांनी राणे यांचं कौतुक केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मोदींनी त्यांचं कौतुक केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट काय?
Birthday greetings to Union Minister Shri Narayan Rane Ji. Rising from the grassroots, he has made a mark as a popular leader and administrator. He is making numerous efforts for a vibrant MSME sector. Praying for his long and healthy life. @MeNarayanRane
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2023
केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मद्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. स्थानिक पातळीवरून उदयास आलेले, लोकप्रिय नेते आणि प्रशासक अशी त्यांची स्तुती करण्यात आली आहे. तसेच MSME क्षेत्राला गती देण्यासाठी ते भरपूर मेहनत घेत आहेत. त्यांना दीर्घ तसेच निरोदी आयुष्यासाठी शुभेच्छा.. अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी इंग्रजीत ट्विट केलंय.
मंत्रिपदाचा दावा कुणी केला होता?
ठाकरे गटाचे नेते आणि नारायण राणे यांचे कट्टर शत्रू वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असा दावा महिनाभरापूर्वीच केला होता. नारायण राणेंकडची कामं आता संपली असून त्यांना शिवसेनेवर टीका करण्याशिवाय दुसरं काही काम नाहीये, अशी टीका नाईक यांनी केली होती.
मोदींवरील टीकेवरून भडकले राणे
मागील आठवड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर टीका केली होती. यावरून एकानंतर एक भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. नारायण राणे यांनीदेखील एक पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची तुझी लायकी नाही. हा शेवटचा इशारा आहे, पुन्हा बोलाल तर याद राखा, असा इशारा नारायण राणे यांनी दिला होता.