काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन, गंगा आरती आणि बरंच काही… कसा असेल पंतप्रधान मोदींचा आजचा वाराणसी दौरा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमधून PM किसान सन्मान निधीचा सुमारे 20,000 कोटी रुपयांचा 17 वा हप्ता जारी करणार आहेत. याशिवाय बचत गटातील 30 हजारांहून अधिक महिलांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. शेतकरी परिषदेत 50 हजार शेतकरी सहभागी करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.
लोकसभा निवडणुकांचा निकाल लागून आता जवळपास दोन आठवडे झाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यानंतर ते मंगळवारी पहिल्यांदाच वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात पोहोचणार आहेत. वाराणसीतील लोकांना आपली आणि काशीला आपली काशी असे म्हणणारे पंतप्रधान मोदी आज रात्रभर मुक्काम करणार आहेत. वाराणसीला पोहोचल्यानंतर पीएम मोदी मेहदीगंजमध्ये किसान सन्मान संमेलनाला संबोधित करतील. यानंतर ते काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर ते दशाश्वमेध घाटावरील गंगा आरतीमध्येही सहभागी होणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत.
कसा असेल वाराणसी दौरा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाबाबत सांगायचं झालं तर ते आज (मंगळवार) दुपारी साडेतीन वाजता लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. तेथून ते थेट हेलिकॉप्टरने मेहदीगंज सार्वजनिक सभेच्या ठिकाणी जातील आणि शेतकऱ्यांच्या जाहीर सभेला संबोधित करतील. 20 हजार कोटी रुपयांची किसान सन्मान निधी DBT द्वारे 9.26 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. यानंतर बचत गटातील 30 हजार महिलांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
बाबा विश्वनाथांच्या दरबारात होणार नतमस्तक
लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे बाबा विश्वनाथ आणि गंगेच्या दर्शनासाठी गेले होते. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मंगळवारी ते पुन्हा एकदा बाबा विश्वनाथांच्या दरबारात नतमस्तक होणार आहेत. तसेच दशाश्वमेध येथे जाऊन गंगा मातेचे दर्शन घेतील आणि आरतीमध्येही सहभागी होतील. पंतप्रधान रात्री वाराणसीतच मुक्काम करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, बुधवारी ते बिहारमधील नालंदाला रवाना होतील.
दोल-ताशांच्या गजरात होणार स्वागत
लोकसभा निवडणूक जिंकून सलग तितसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी केवळ भाजप कार्यकर्तेच नव्हे तर काशीची जनताही आतुर आहे. लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि मेहंदीगंज ग्रामसभेच्या ठिकाणीदेखील भाजप कार्यकर्ते हे पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करणार आहेत. पोलिस लाईन ते दशाश्वमेध घाटा आणि विश्वनाथ मंदिराचापर्यंतच्या संपूर्ण यात्रा मार्गावर काशीतील जनतेसोबतच भाजपचे कार्यकर्ते शंख फुंकून आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून, ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधानांचे जंगी स्वागत करणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.