‘एकनाथ शिंदे अडचणीत आलेत’ राज्यातल्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य काय?
सर्वोच्च न्यायालयाने आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा नोटबंदीच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न विचारलाय, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
चंद्रपूरः राज्यातून एकानंतर एक प्रकल्प बाहेर जात आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची फार अडचण होणार नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) तोंड द्यावं लागणार आहे. ते जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे. पहिला प्रकल्प गेला तेव्हा आम्ही जबाबदार नव्हतो, असे ते म्हणाले. मात्र आता सरकारच्या हातून दोन प्रकल्प गेले आहेत. याचं उत्तर द्यावं लागणार आहे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलंय. ते म्हणाले, वेदांता प्रकल्पानंतर दोन प्रकल्प तर राज्याच्या हातून गेले. आता तिसराही पेट्रो केमिकल्सचा प्रकल्प कर्नाटकात जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे असे प्रकल्प बाहेर जाताना, एकनाथ शिंदे अडचणीत आहे, असे मी मानतो, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान आहे, असं वाटतं. ते सगळे प्रकल्प गुजरातला घेऊन जात आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
दक्षिणेकडील राज्यांवर हिंदी लादणे गैर असून आता कुठे या राज्यांमध्ये हिंदीला स्थान मिळू लागले होते मात्र आता या राज्यांवर आर्थिक व भाषिक संकट कोसळले असून त्यासाठी मोदी जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. मोदी यांनी एखादं स्टेटमेंट वाचण्यापलिकडे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे.
शिकलेल्या माणसांबद्दल मोदींना आता अडचण होत आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा नोटबंदीच्या भूमिकेसंदर्भात. आता लिहिणारे किंवा बुद्धिवादी, शहरी पेन नक्षलवादी असं नवीन टोपणनाव त्यांनी नाव दिलंय. त्या बुद्धिवादी, नक्षलवादी लोकांनी आपलं नाव नक्षलवादी करावं, अशी उपसाहात्मक विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जोडो भारत यात्रा म्हणजे ब्लाइंड मार्च अथवा ब्लँक मार्च आहे. यात कुठलाही उद्देश दिसत नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी देखील असाच एक प्रयत्न केला होता मात्र त्याला तात्विक किनार होती असे सांगत जे तुटलेच नाही त्याला जोडण्यासाठी अट्टाहास का असा प्रति सवाल त्यांनी केला.
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत पैशाचा मोठा व्यवहार झाला असून या ठिकाणी निवडून आलेल्या सरपंच पदांबाबत मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याने या संपूर्ण प्रकरणाची ईडीने चौकशी करावी, अशी तक्रार आपण करणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपुरात दिली.