नवी दिल्ली: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi), काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi), प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांशी चर्चा केली. यावेळी काँग्रेसने त्यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा रोड मॅप देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार प्रशांत किशोर यांनी हा रोडमॅप तयार केला आहे. प्रशांत किशोर येत्या जूनमध्ये हा आपला पीपीटी प्लान सोनिया गांधी यांना देणार असून त्याचं सादरीकरणही करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच या रोडमॅपमधील महत्त्वाच्या गोष्टी बाहेरही आल्या आहेत. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला विजयाचा पंचसूत्री कार्यक्रमच दिला आहे. त्यामुळे काँग्रेस या पंचसूत्रीचा अवलंब करणार का? आणि या पंचसूत्रीमुळे काँग्रेसचे 2024मध्ये सत्तेत पुनरागमन होणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. प्रशांत किशोर यांनी या सादरीकरणाची सुरूवात महात्मा गांधींच्या एका कोटपासून केली आहे. ”The Indian National Congress… cannot be allowed to die, it can only die with the nation” म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला कधी मरू दिलं जाऊ शकत नाही. कारण काँग्रेसचा अंत केवळ राष्ट्रासोबतच होऊ शकतो, असं गांधीजींच्या कोटने या पीपीटीची सुरुवात करण्यात आली आहे.
आजतकने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. प्रशांत किशोर यांनी या सादरीकरणामध्ये देशाची लोकसंख्या, मतदार, विधानसभेच्या जागा, लोकसभेच्या जागा दिल्या आहेत. तसेच या सादरीकरणात महिला, तरुण, पुरुष, तरुणी, शेतकरी आणि लघु उद्योजकांची आकडेवारीही दिली आहे. तसेच 2024मध्ये पुन्हा एकदा 13 कोटी फर्स्ट टाईम व्होटरवरही फोकस करण्यात आला आहे.
राज्यसभा आणि लोकसभेत काँग्रेसचे 90 खासदार आहेत. विधानसभांमध्ये काँग्रेसचे 800 आमदार आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेसची तीन राज्यात सत्ता आहे. तसेच इतर तीन राज्यात काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. तर 13 राज्यात काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे. तर तीन राज्यात काँग्रेस मित्र पक्षांसोबत मुख्य विरोधी पक्ष आहे, अशी माहितीही या पीपीटीमध्ये देण्यात आली आहे. 1984नंतर काँग्रेसची व्होट बँक सातत्याने घटल्याची माहितीही यात देण्यात आली आहे.
प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला पंचसूत्री कार्यक्रम दिला आहे. तसेच काँग्रेसला त्यानुसार पावलं उचलण्यास सांगितलं आहे. प्रशांत किशोर यांनी दिलेला पंचसूत्री कार्यक्रम पुढील प्रमाणे.
>> नेतृत्वाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.
>> आघाडीशी संबंधित मुद्दा मार्गी लावला पाहिजे.
>> पक्षाच्या जुन्या सिद्धांतांचं पालन केलं पाहिजे
>> ग्रासरूटला कार्यकर्ता आणि नेत्यांची फौज तयार केली पाहिजे.
>> कम्युनिकेशन सिस्टिममध्ये बदल करण्याची गरज
एवढेच नव्हे तर काँग्रेसचा आघाडी करण्याचा प्लान कसा असावा याची माहितीही यात देण्यता आली आहे. यावेळी त्यांनी तीन परिस्थितींचा उल्लेख केला आहे. एक म्हणजे काँग्रेसने संपूर्ण देशात स्वबळावर निवडणुका लढाव्यात. दुसरी गोष्ट म्हणजे मोदींना पराभूत करायचं असेल तर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून यूपीएला मजबूत केलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढाव्यात आणि काही ठिकाणी मित्रपक्षांशी मिळून निवडणुका लढाव्यात. या काळात काँग्रेस पक्षाची प्रतिमाही कायम ठेवावी.
संबंधित बातम्या: