Prashant Kishore : म्हणूनच तर मोदींच्या पायावर घातले त्यांनी लोटांगण, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना काढले सोलपटून
Prashant Kishore Attack on CM Nitish Kumar : लोकसभा निवडणूक प्रचारात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाय धरले होते. तर मोदींना एनडीएचे नेते घोषीत केल्यावर हीच कृती केली होती. त्यावरुन प्रशांत किशोर यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडताना दिसले. एका वर्षापूर्वी तर त्यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली होती. इंडिया आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. पण त्यानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि मोदींना जवळ केले. लोकसभा निवडणूक प्रचारात नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाय धरले होते. त्यानंतरही त्यांनी अशीच कृती केली. आता राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी या सर्व प्रकारानंतर नितीश कुमार यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.
नितीश कुमारांनी ठरवले असते मोदी सरकार नसते
“देशाने काही दिवसांपूर्वी पाहिले की, मीडिया सारखा ओरडत होता की, नितीश कुमार यांच्या हातात देशाची कमान आहे. नितीश कुमार यांनी जर ठरवले तर सध्याचे केंद्रातील सरकार आले नसते. इतकी ताकद नितीश कुमार यांच्या हातात आहे. पण वस्तूस्थिती काय आहे? हे केवळ बिहारनेच नाही तर संपूर्ण देशाने पाहिले.” असा खरमरीत टोला त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना लगावला. जन सुराज्य अभियानातंर्गत एका सभेत त्यांनी नितीश कुमार यांना टार्गेट केले.
नितीश कुमार यांच्या धोरणावर कठोर प्रहार
” NDA सरकार तयार करण्यात नितीश कुमार यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. पण त्या बदल्यात त्यांनी मागितले काय? बिहारमधील तरुणांच्या हाताला काम, रोजगार. नाही मागितला. बिहारमधील जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने सुरु करण्याची मागणी केली, नाही केली. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली का? तर नाही केली. मग बिहारमधील जनतेच्या मनात प्रश्न पडला आहे की, नितीश कुमार यांनी मागितले तरी काय? नितीश कुमार यांनी 2025 नंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. त्यासाठी तर त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. पाय धरले. नितीश कुमार यांनी बिहारमधील जनतेची इज्जत विकली.” अशी तिखट टीका प्रशांत किशोर यांनी केली.
मुख्यमंत्री पदासाठी घातले लोटांगण
प्रशांत किशोर यांनी त्यांचा हल्लाबोल सुरुच ठेवला. ” 13 कोटी लोकांचा जो नेता आहे. पुढारी आहे. आपल्या लोकांचा अभिमान, स्वाभिमान, सम्मान आहे, तो संपूर्ण देशासमोर केवळ मुख्यमंत्र वाचविण्यासाठी पायावर लोटांगण घेत आहे.” असे टीकास्त्र त्यांनी डागले. विशेष म्हणजे प्रशांत किशोर हे काही काळ जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पण राहिले आहेत. प्रशांत किशोर यांचे राजकीय अंदाज गेल्या काही वर्षांपासून तंतोतंत जुळत असल्याने त्यांचे भारतीय राजकाराणात चांगले वजन आहे.