राष्ट्रपती मुर्मू यांनी नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी केली नियुक्ती, स्वतःच्या हाताने खाऊ घातले दही

| Updated on: Jun 07, 2024 | 11:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. NDA संसदीय पक्षाची शुक्रवारी बैठक झाली ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांची एकमताने नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व पक्षांनी मोदींना पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना सुपूर्द केले.

राष्ट्रपती मुर्मू यांनी नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी केली नियुक्ती, स्वतःच्या हाताने खाऊ घातले दही
Follow us on

दिल्लीत एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व सोपवण्यात आले. यावेळी सर्व एनडीए पक्षांचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीचे फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपतींची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 75(1) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती केली.

नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी पंतप्रधानपदी नियुक्ती केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी स्वत:च्या हाताने नरेंद्र मोदी यांना दही खाऊ घातले. पीएम मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. लोकांना तो फोटो खूप आवडत आहे. नरेंद्र मोदी रविवारी, 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 09 जून 2024 रोजी संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री परिषदेच्या इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

दिल्लीत कलम 144 लागू

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज कलम 144 लागू केले आहे. दिल्लीत 9 आणि 10 जूनसाठी नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आला आहे. ९ जूनला एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता न आल्याने इतर मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सरकार स्थापन करणार आहे. 7 जून रोजी झालेल्या NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना संसदेता नेता म्हणून घोषित करण्यात आला. राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला ज्यावर अमित शाह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिले. तसेच एनडीएमधील घटक पक्षांच्या प्रमुखांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला.