पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘Deepfake तंत्र अराजक माजविणारे’, स्वत:च्या व्हिडीओचा केला उल्लेख
आधुनिक डीपफेक तंत्रामुळे कोणाचाही खोटा व्हिडीओ हुबेहुब तयार करता येत असल्याने खळबळ उडाली आहे. साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना हीचा खोटा व्हिडीओ अशा पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याने तिला मन:स्ताप झाला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डीपफेक तंत्रावर भाष्य केले असून यामुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते असे म्हटले आहे.
नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : टेक्नॉलॉजी आणि आर्टीफिशियल इंटेलिजन्स ( AI ) च्या जमान्यात कोणत्याही फोटो, व्हिडीओ आणि ऑडीयोत बदल करून कोणाचीही बदनामी केली जाऊ शकते. या आर्टीफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा वापर करुन दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदाना हीचा हुबेहुब व्हिडीओ तयार करुन व्हायरल केल्याने खळबळ उडाली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करीत डीपफेक तंत्र समाजात अशांती निर्माण करु शकतील असे म्हटले आहे.
अशांतता निर्माण करणारे तंत्र –
डीपफेक तंत्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. डीपफेकमुळे समाजात तणाव निर्माण होण्यास खतपाणी मिळू शकते. या तंत्रामुळे समाजाला मोठा धोका आहे. त्यामुळे जनरेटीव एआयच्या माध्यमाने तयार केलेल्या फोटो आणि डिस्क्लेमर असायला हवा की हा व्हिडीओ किंवा चित्र डीपफेकचा वापर करुन तयार केलेला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
गरब्याच्या व्हिडीओचा केला उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक तंत्रज्ञानाला भारतीय व्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. डीपफेकमुळे समाजाला मोठा धोका असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी लोकांनी आणि मिडीयाने डीपफेक बद्दल खूप सर्तक राहीले पाहीजे. मी स्वत:चा एक व्हिडीओ पाहीला ज्यात मी गरबा खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ एकदम खरा वाटत होता. परंतू आपण लहानपणापासून कधी गरबा खेळलाच नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
व्हिडीओ नेमका कोणाचा
गेल्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरबा डान्स खेळतानाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा दिसणारा व्यक्ती गरबा खेळत आहे. नवरात्रीत गरबा खेळताना नरेंद्र मोदी अशी कॅप्शन हा व्हिडीओ व्हायरल करताना दिली जात आहे. मात्र हा व्हिडीओ मोदी यांच्या सारखे दिसणारे विकास महंते यांचा आहे.