BREAKING | अमित शाह यांच्या ताफ्यात अज्ञात कार घुसली, नेमकं काय घडलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या ताफ्यात एका अज्ञाताने कार घातल्याची माहिती समोर आली आहे.
अगरतला : त्रिपुरा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा प्रकार समोर आलाय. शाह यांच्या ताफ्यात अज्ञात कार घुसली. त्यांचा ताफा गेस्ट हाऊसपासून अगरताला विमानतळाकडे जात असताना अज्ञात कार त्यांच्या ताफ्यात घुसली. पोलिसांनी कारला थांबवलं असतानाही चालकाने कार ताफ्यात वळवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी त्रिपुरा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
अमित शाह यांच्या ताफ्यात अशाप्रकारे चूक होणारी ही पहिली घटना नाही. याआधी सहा महिन्यांपूर्वी तेलंगणातील हैदराबादमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला होता. तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्याने अमित शाह यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर स्वत:ची कार उभी केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडालेली. त्यामुळे संबंधित नेत्याची कार सुरक्षा रक्षकांनी जबरदस्ती तिथून हटवली होती.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत देखील मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली होती. नरेंद्र मोदी विकासकामांच्या उद्घाटनानिमित्ताने पंजाबला गेले होते. पण त्यावेळी अचानक काही आंदोलक त्यांच्या ताफ्यासमोर आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तिथून परतावं लागलं होतं. विशेष म्हणजे मोदी यांचा तो दौराच त्यावेळी रद्द करण्यात आलेला.