Railway Privatization : भारतीय रेल्वे खासगी हातात? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तर स्पष्टच सांगितले..
Railway Privatization : देशात काही बँका, कंपन्यांच्या खासगीकरणाची चर्चा नाही तर केंद्राने त्यासाठी पाऊल पण टाकले आहे. काही वर्षांपासून रेल्वेचे खासगीकरण करण्यात येईल अशी चर्चा रंगली आहे. याविषयी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा खुलासा केला आहे.
नवी दिल्ली : देशात काही बँका, कंपन्यांच्या खासगीकरणाची चर्चा नाही तर केंद्राने त्यासाठी पाऊल पण टाकले आहे. काही वर्षांपासून रेल्वेचे खासगीकरण (Railway Privatization) करण्यात येईल अशी चर्चा रंगली आहे. रेल्वे हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. देशाची लांबी-रुंदी पाहता, स्वस्त आणि जलद प्रवासासाठी रेल्वे हा भारतीयांसाठी चांगला पर्याय आहे. रेल्वेच्या सुविधांविषयी नाराजी असली तरी त्यात मोठ्या सुधारणा सुरु आहेत. त्यातच गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात आला आहे. आता केंद्र सरकार रेल्वे खरंच खासगी व्यक्तीच्या हातात देईल का, याविषयी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनीच खुलासा केला आहे.
रेल्वे मंत्र्यांनी संसदेत दिले उत्तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत या विषयावर खुलासा केला. रेल्वेच्या खासगीकरणाचा सध्या कोणतीच योजना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी याविषयी लिखीत उत्तर दिले आहे. त्यातील माहितीनुसार, रेल्वेच्या खासगीकरणाचा कोणताच प्लॅन केंद्र सरकारने आखलेला नाही.
रेल्वेत सुविधा वाढविण्यावर भर रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिला. त्यांनी या चर्चांचे खंडण केले. तसेच रेल्वे सेक्टरचा विकास करण्यावर सरकारचा जोर असल्याची माहिती दिली. रेल्वे प्रवाशांना अत्याधिक आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही वर्षात रेल्वे सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
वंदे भारत आता येथून धावणार वंदे भारत रेल्वेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी, अनेक राज्यात वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. वंदे भारत रेल्वेसाठी अनेक राज्यांकडून मागणी करण्यात येत आहे. जलद आणि आरामदायक प्रवासासाठी या ट्रेनला पसंती मिळत आहे. वंदे भारत रेल्वे आता देशातील जवळपास सर्वच मार्गांवर सुरु करण्याची योजना आहे.
गति शक्ती कार्गोवर भर रेल्वे मंत्र्यांनी गती शक्ती कार्गोवर (GCT) भर दिला आहे. या प्रकल्पावर काम सुरु आहे. येत्या तीन वर्षांत जीसीटीचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 22 जीसीटीवर काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास अत्यंत आरामदायक आणि गतीने होईल.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेशन मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ जवळील हबीबगंज रेल्वे स्टेशन हे देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन साकारण्यात येत आहे. जगातील अनेक देशात रेल्वे ही खासगी कंपनीच्या हातात आहे. परंतु, भारतात रेल्वे ही सरकारचा उपक्रम आहे. रेल्वेच्या अनेक क्षेत्रात हळूहळू खासगीकरणाला वाव देण्यात आला आहे. अनेक सेवा सध्या खासगी कंपन्यांकडे सोपविण्यात येत आहेत. भारतात आता पहिले खासगी रेल्वे स्टेशन पण उभारण्यात येत आहे. हबीबगंज(राणी कमलापती) रेल्वे स्टेशन फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. हे रेल्वे स्टेशन आंतरराष्ट्रीय मानकांवर उभारण्यात येत आहे.