शीतल म्हात्रे प्रकरणात नवं ट्विस्ट? ‘तो’ व्हिडीओ प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या अकाऊंटवर लाइव्ह होता?; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा काय?
शीतल म्हात्रे प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणात राज सुर्वे यांना अटक का केली नाही? असा सवाल केला आहे. राज सुर्वे यांच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ लाइव्ह होता असा दावा त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडीओच्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. महिला आमदारांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनाही अटक केली जात असतानाच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोठं विधान केलं आहे. तो व्हिडीओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या अकाऊंटवरही लाइव्ह होता. मग त्यांना का अटक केली नाही? असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाल्याची चर्चा आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. त्या रॅलीचा व्हिडीओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या अकाऊंटवर लाइव्ह होता. त्यांची बदनामी ही प्रकाश सुर्वेंच्या घरातूनच सुरू झाली. त्यामुळे अटक करायची होती तर त्यांना करायची होती. मुंबई पोलिसांनी दबावाखाली काम करू नये. अन्यथा मुंबई पोलिसांचा जो सन्मान आहे तो मातीत मिळेल. सायबरचं काम आहे तपासण्याचं ते करतील, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. चतुर्वेदी यांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही
आज सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहे. निकाल हा आमच्या बाजूनं लागणार असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या वकिलांनी चांगला युक्तिवाद केलाय. बंडखोर आमदारांनी 10 व्या शेड्युलचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे ते अपात्र होतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतला त्यावरही सुप्रीम कोर्ट त्यावरही निर्णय देईल. पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंना मिळेल, असा विश्वास चतुर्वेदी यांनी व्यक्त केला. शिंदे गटाने काहीही केलं तरी त्यांच्या कपाळवरील गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. ते हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. लोक यांना निवडणूकीत उत्तर देतील, असंही त्या म्हणाल्या.
साईनाथ दुर्गेंना कोर्टात हजर करणार
दरम्यान, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. पण त्यात सर्वात महत्त्वाची अटक म्हणजे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय साईनाथ दुर्गेंची आहे.साईनाथ दुर्गे यांना काल पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर दहिसर पोलिसांनी त्याला अटक केली. साईनाथ दुर्गे यांना आज बोरिवली न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे कोर्ट त्यांना काय शिक्षा देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काल साईनाथ दुर्गे यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रे यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे.