सोनभद्र जमीन वादातून 10 जणांची हत्या, पीडितांना भेटण्यास गेलेल्या प्रियांका गांधी ताब्यात
उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडानंतर राजकारण तापलं आहे. पीडितांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडानंतर राजकारण तापलं आहे. पीडितांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून 10 जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. याप्रकरणी पीडितांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी निघाल्या होत्या, त्यावेळी पोलिसांनी नारायणपूरजवळ त्यांना ताब्यात घेतलं.
सध्या सोनभद्रमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रियांका गांधींना रोखलं. त्यानंतर प्रियांका गांधींनी रस्त्यातच ठाण मांडून आंदोलन सुरु केलं असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
“पोलीस आम्हाला ताब्यात घेऊन कुठे नेत आहेत हे आम्हालाही माहीत नाही. मात्र आम्ही कुठेही जाण्यास तयार आहोत”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
Priyanka Gandhi Vadra detained in Narayanpur by Police. She was on her way to meet victims of firing case in Sonbhadra where section 144 has been imposed. Says ‘I don’t know where are they taking me, we are ready to go anywhere.’ pic.twitter.com/YF2kIXA9DL
— ANI UP (@ANINewsUP) July 19, 2019
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे बुधवारी जमिनीच्या वादातून फिल्मी राडा आणि गोळीबार झाला होता. 100 एकर जमिनीसाठी जुन्या वैमन्यस्यातून दोन गटांमध्ये समोरासमोर गोळीबार झाला होता. 30 ट्रॅक्टर भरुन आलेल्या 300 लोकांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर केलेल्या गोळीबारात तब्बल 10 जण ठार झाले होते. तर 24 पेक्षा अधिक जखमी आहेत. सोनभद्र येथील घोरावल कोतवाली परिसरातील उभभा गावात बुधवारी (17 जुलै) ही घटना घडली. गुजर आणि गोंड समाजात हा हिंसाचार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी 24 जणांना अटक केली आहे, तर 78 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.