Pt. Shivkumar Sharma : गायकी, तबला ते संतूर! शिवकुमार शर्मा ते पंडित शिवकुमार शर्मा प्रवास कसा होता?
प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले, त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे संगित क्षेत्रात भरीव योगदान राहिले. पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक पुरस्काराने गैरवण्यात आले आहे.
मुंबई : प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिॲक अरेस्टने (cardiac arrest) त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी झाला. भारतीय शास्त्रीय संगितात संतूर वाजवणारे ते पहिले संगीतकार होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते, अखेर त्यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जाणून घेऊयात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचा परिचय
पंडित शिवकुमार शर्मा यांचा अल्प परिचय
पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी जम्मू काश्मीरमधील डोगरामध्ये झाला. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांचं नाव उमा दत्त शर्मा होतं. उमा दत्त शर्मा उत्तम वादक आणि गायकही होते. संतूर वाद्याची त्यांना पुरेपूर जाण होती. त्यांनीच या वाद्यावर संशोधन करत या वाद्याला एक महत्त्व आणि दर्जा मिळवून दिला होता. त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्याला कलात्मक जोड देत, हे वाद्य जगभरात पोहोचवलं. पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीताचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला आपल्या वडिलांकडूनच त्यांनी गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर गाणं सोडून ते तबला शिकले. 13 वर्षापासून त्यांनी संतूर वाद्य शिकण्यास सुरुवात केली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या संतूर वादनात त्यांनी प्रावीण्य मिळवलं. भारतात संतूरला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात शिवकुमार शर्मा यांचं मोठं योगदान आहे. शिवाय भारतासोबत जगभरात त्यांनी संतूर वादनाला एक वेगळं वलय प्राप्त करुन दिलं. पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरमध्ये अनेक प्रयोग केले.
जगभरात शिष्य
शास्त्रीय संगीतासोबत त्यांनी अनेक हिंदी सिनेमांनाही आपल्या संतूर वादनानं चारचांद लावले होते. प्रसिद्ध बासरी वादक हरिप्रसाद चौरसीया यांच्यासोबत त्यांनी शिव-हरी या नावानं संगीत दिग्दर्शक म्हणून एकापेक्षा एक यादगार गाणी संगीतबद्ध केली. डर, सिलसिला, लम्हे या सिनेमांमधील एव्हरग्रीन गाणी त्यांच्या कामाची पावती देतात. आंतरध्वनी नावाच्या एका रागाचेही शिवकुमार शर्मा यांनी संशोधन केलं. जगभरात त्यांचे अनेक शिष्य आहेत.
प्रसिद्ध पुरस्कारांनी गौरव
संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं 1986 साली गौरव
महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित 1990
पद्मश्री पुरस्कारानं गौरव 1991
उस्ताद हाजिफ अली खाँ पुरस्कारानं सन्मान 1998
पद्मविभूषण पुरस्कारानं गौरव 2001
जम्मू विश्वमहाविद्यालयातून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान 1991