पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय कामाला लागलं
नवी दिल्ली : पाकिस्तान प्रेरित दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर केंद्र सरकार कामाला लागलंय. जागतिक स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पहिलं पाऊल उचललंय. जगभरातील 25 देशांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्लीत हजेरी लावत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन भारताने केलं होतं. सूत्रांच्या […]
नवी दिल्ली : पाकिस्तान प्रेरित दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर केंद्र सरकार कामाला लागलंय. जागतिक स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पहिलं पाऊल उचललंय. जगभरातील 25 देशांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्लीत हजेरी लावत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन भारताने केलं होतं.
सूत्रांच्या मते, पुलवामा हल्ल्यातील पाकिस्तानची भूमिका जगासमोर आणण्यासाठी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी 25 देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या देशांमध्ये पी 5 (चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, अमेरिका) यांचाही समावेश होता.
पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या संघटनेचा पुलवामा हल्ल्यात हात होता ही बाब सर्व देशांनी स्वीकारली आहे. पाकिस्तानने दहशतवादाला बळ देणं बंद करावं, अशी मागणी भारताने या बैठकीत केली.
पाकिस्तानने स्वतःच्या हितासाठी दहशतवादाला कसं बळ दिलंय याबाबतही विजय गोखले यांनी 25 देशांच्या प्रतिनिधींना माहिती दिल्याचं बोललं जातंय. पुलवामा हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग जगासमोर आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सर्व प्रकारची पाऊलं उचलण्यात आली आहेत. शिवाय पाकिस्तानची जैश ए मोहम्मद संघटना आणि या संघटनेचा प्रमुख मसूद अजहरविरोधात कारवाईसाठी मागणी केली जाणार आहे.
जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारताकडून जाहीरपणे सांगण्यात आलंय. त्याचाच भाग म्हणून या सर्व देशांच्या प्रतिनिधींसोबत परराष्ट्र मंत्रालयाने चर्चा केली.
कोणकोणत्या देशांसोबत चर्चा?
भारतीय परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा केलेल्या देशांमध्ये दक्षिण कोरिया, स्वीडन, स्लोवाकिया, फ्रान्स, स्पेन, भुटान, जर्मनी, हंगेरी, इटली, युरोपियन युनियन, कॅनडा, ब्रिटन, रशिया, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश होता. यासह इतर अनेक देशांनी अगोदरच पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करत आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं होतं.