नवी दिल्लीः पाकिस्तानकडून दिवसेंदिवस भारतावर करण्यात येणाऱ्या कुरघोड्या वाढतानाच दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सीमेवर ड्रोनची घुसखोरी (Drone intrusion) थांबण्याचे नाव काही घेण्यात येत नाही. गुरुदासपूरमध्ये (Gurudaspur Border) आज सकाळी पुन्हा एकदा ड्रोनने सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी बीएसएफ जवानांनी ड्रोनकडून होणारी घुसखोरी हाणून पाडण्यात आली. या घटनेमुळे पोलीस आणि बीएसएफच्या जवानांकडून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात येत असून या घुसखोरीमागील कोणतेही कारण अजून स्पष्ट झाले नाही.
गुरुदासपूर सीमेवर पहाटेच्या सुमारास बीएसएफ जवानाला घुसखोरी करणारा हा पाकिस्तानी ड्रोन दिसला होता. सीमेवरील बीओपी 89 कॉर्प्सच्या परिसरात ही भारताच्या हद्दीत ड्रोनकडून ही घुसखोरी करण्यात आली होती.
त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या जवान आणि कॉन्स्टेबल योगेंद्र यांच्याकडून ड्रोनवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यावर दोन हलके बॉम्बही फेकण्यात आले. त्यामुळे वरती आलेला ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने निघून गेला.
या घटनेनंतर पोलीस आणि बीएसएफ जवान सतर्क झाले असून या परिसरात जोरदार शोधमोहीम राबविण्यात येत आहे. जवानांकडून ड्रोवर गोळीबार आणि बॉम्ब हल्ला करण्यात आल्यानंतर मात्र या घटनेनंतर आलेला तो ड्रोन पुन्हा दिसला नाही.
याआधीही पंजाब सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन पाठवून घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे हे ड्रोन पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर रेकी करण्यासाठी पाठवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंजाब सीमेवर ज्यावेळी ड्रोनकडून घुसखोरी केली जाते त्यावेळी रेकी केली जात असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेपलीकडून या बाजूला येणारे ड्रोन हे सैनिक तैनात असलेल्या जागेची पाहणी करण्याकरिता पाठवले जातात असंही सांगण्यात आले आहे. सध्या ड्रोन हा घुसखोरी करण्यासाठी महत्वाचे साधन बनले आहे.
एवढेच नाही तर सीमेपलीकडून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करीही या ड्रोनद्वारे केली जात असून जम्मू-काश्मीरमध्येही पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात या ड्रोनद्वारे दहशतवादी संघटनांना रोख रक्कम आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.