वॉशरुमला जायलाही विद्यार्थिनी थरथरतायत, हिडन कॅमेरे शोधताना पोलिसांची दमछाक, MMS प्रकरणानंतर मोहालीत दहशत
चंदीगड विद्यापीठातील एमएमएस कांड आता वेगळ्याच वळणावर पोहचले आहे. वसतिगृहातील अनेक विद्यार्थिनींना आता मानसिक धक्का बसला असून त्यांनी आता विद्यापीठ परिसर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
चंदीगडः चंदीगड विद्यापीठातील ( Chandigarh University) एमएमएस (MMS) कांड उघडकीस आल्यानंतर त्याचा अनेक विद्यार्थिनींना आता मानसिक धक्का बसला आहे. विद्यापीठातील विद्यार्थिनी आता कॅम्पसमधील वॉशरूममध्ये जाण्यासही घाबरत आहेत. विद्यापीठातील या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थिनी आता आपापल्या घरी परतत आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या ६० हून अधिक विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ (Video Viral) बनवून एका विद्यार्थिनीने आपल्या प्रियकराला पाठवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामधील काही काही व्हिडीओ हे सोशल मीडिया आणि काही वेबसाइटवर अपलोड केल्याचाही आरोप केला आहे.
विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघटनेकडून याबाबत गंभीर आरोप केले जात असले तरी पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस म्हणतात की, मुलीने तिचा व्हिडीओ बनवून प्रियकराला शेअर केला आहे.
ज्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तिच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की, विद्यार्थिनी या प्रकारामुळे घाबरल्या आहेत,त्यामुळे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एमएमएस कांड घडल्यानंतर विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यार्थिनींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता त्यांना कॅम्पसमधील वॉशरूममध्ये जाण्याची भीती वाटू लागली आहे.
त्यामुळे पोलिसांनी आता वसतिगृहातील छुपे कॅमेरे शोधून काढण्याचा तपास करत आहेत. त्यामुळे ज्या मुली वसतिगृहात राहतात, त्यांना आता भीती वाटणे साहजिकच असल्याचे त्यांनी सांगितले.
तर ज्या विद्यार्थी संघटनेने विद्यार्थिनींच्या न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारले आहे, त्यांनी पोलिसांवर ठपका ठेवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्या मुलीने आपले व्हिडीओ आपल्या प्रियकराला पाठवले असतील तर तिला पोलिसांनी ताब्यात का घेतले आहे.
त्यामुळे आमचा आता पोलिसांवर विश्वास नाही असं विद्यार्थ्यांनी जाहीर केलं आहे. पोलीस आमची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही पंजाब पोलिसांवर त्यांनी केला आहे.
एकीकडे पोलिसांवर आरोप केले जात असतानाच आता वॉर्डनच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही हा वाद पेटण्याची शक्यता आहे. प्रॉब्लेम व्हिडीओमध्ये नाही तर तुमच्या कपड्यांमध्ये आहे असं जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळेच विद्यार्थिनीनी वसतिगृहातील समस्या विद्यापीठ प्रशासनकडे मांडताना घाबरत असल्याचे सांगण्यात येत आहे.