Bhagwant Mann : भगवंत मान यांचं ‘शुभमंगल’; गुरप्रीत कौर यांच्याशी होणार विवाहबद्ध, काय खास? जाणून घ्या…
मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आधीही विवाह झाला होता. मात्र 6 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पूर्वपत्नीशी घटस्फोट (Divorce) घेतला होता.
चंदीगढ : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) उद्या चंदीगढ येथील त्यांच्या घरी डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत एका खाजगी समारंभात विवाहबद्ध होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री मान यांचा आधीही विवाह झाला होता. मात्र 6 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पूर्वपत्नीशी घटस्फोट (Divorce) घेतला होता. . चंदिगडच्या सीएम हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 48 वर्षीय भगवंत मान यांचा 2015मध्ये पहिली पत्नी इंद्रप्रीत कौर यांच्यापासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्या मुलांसह अमेरिकेला गेल्या. सीएम मान यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून 2 मुले आहेत. त्यांची मुले-मुली अमेरिकेत असतात. भगवंत मान यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते आले होते.
आधीपासून होती ओळख
मान यांची बहीण मनप्रीत कौर यांच्याशी डॉ. गुरप्रीत कौर यांची आधीच ओळख आहे. ते एकमेकांच्या परिचयातील आहेत. मान यांची बहीण मनप्रीत आणि गुरप्रीत यांनीही अनेकदा एकत्र शॉपिंग केली आहे. मान यांची आई हरपाल कौर आणि बहीण मनप्रीत कौर यांनी हे लग्न जमवले. कुटुंबीयांच्या आग्रहास्तव मान यांनी लग्नाला संमती दिली.
राजकारणात प्रवेश आणि…
भगवंत मान हे पंजाबचे एक कॉमेडियन आहेत. त्यांचा विवाह इंद्रप्रीत कौर यांच्याशी झाला होता. भगवंत मान 2012मध्ये राजकारणात आले. त्यांनी पंजाब पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला. 2012मध्ये त्यांनी लेहरागागा येथून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. 2014मध्ये त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांना संगरूरचे तिकीट मिळाले. त्यानंतर पत्नी इंद्रप्रीत कौर यांनीही प्रचार केला. मात्र, खासदार झाल्यानंतर मान यांचे पत्नीसोबतचे संबंध बिघडले. कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.
पहिल्या पत्नीचे कौतुक
भगवंत मान यांनी त्यांच्या मागील घटस्फोटाबाबत सांगितले होते, की त्यांना कुटुंब किंवा पंजाब यापैकी एक निवडावा लागेल. मात्र, त्यांनी पंजाबची निवड केली. त्यांनी मुलगा दिलशान आणि मुलगी सीरत यांचेही कौतुक केले. मान यांनी आपल्या पहिल्या पत्नीचेही मुलांचे उत्तम संगोपन केल्याबद्दल कौतुक केले.
सामान्य कुटुंबातील मुलीशी लग्न
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवंत मान एका सामान्य घरातील मुलीशी लग्न करत आहेत. संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी खासदार राघव चढ्ढा पार पाडत आहेत. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही कुटुंबासह या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.