चंदीगड : बालपणी मुलांची आई-वडिलांपासून ताटातूट होते. मुलं मोठी होतात. काही वर्षांनी मुल कमावती झाल्यानंतर अपघाताने मुलांची पुन्हा त्यांच्या आई-वडिलांबरोबर भेट होते. विखुरलेल कुटुंब पुन्हा एकत्र येते. हे आतापर्यंत आपण अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. असं कधी खऱ्या आयुष्यात घडत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येते. हो, रिअल लाईफमध्ये असच घडलय. पंजाबच्या पतियाळामध्ये एखाद्या बॉलिवूड सिनेमाला साजेसा प्रसंग घडला.
तब्बल तीन दशकानंतर मुलाला त्याच्या आईचा शोध लागला. मुलाला त्याची आई सापडली. हा खूपच भावनिक प्रसंग होता. नेमक काय घडलं? त्या बद्दल जाणून घेऊया.
त्यावेळी दोघांच्या डोळ्यात अश्रू होते
सध्या देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पंजाबमध्येही तीच स्थिती आहे. मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे. गावात पुराच पाणी शिरलं आहे. अशाच एका पूरग्रस्त गावात जगजीत सिंग मदतीसाठी गेला होता. त्यावेळी तिथे त्याला, तब्बल 35 वर्षानंतर त्याची आई भेटली. पतियाळा येथील गावात 20 जुलैला ही माय-लेकाची भेट झाली. फेसबुकवर त्याने हा क्षण रेकॉर्ड केला. मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकलो नाही, हे सुद्धा जगजीतने सांगितलं. माय-लेकाने परस्पराची गळाभेट घेतली, त्यावेळी दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
आई-वडिलांच निधन झालं, असं त्याला सांगितलेलं
जगजीत सहा महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांच निधन झालं. त्यावेळी त्याची आई हरजीत कौर यांनी दुसरं लग्न केलं. दोन वर्षांचा होईपर्यंत जगजीत त्याच्या आईसोबत होता. त्यानंतर त्याला त्याचे आजी-आजोबा घेऊन आले. जगजीत मोठा होत असताना, तुझ्या आई-वडिलांच कार अपघातात निधन झालं असं सांगितलं.
नियतीच्या मनात काही वेगळच
जगजीतही आपले आई-वडिल हयात नाहीत, याच समजात होता. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. अशाकाही अनपेक्षित घटना घडल्या की, ज्यामुळे पतियाळाच्या बोहारपूर गावात जगजीतची, आई हरजीत कौर बरोबर भेट झाली. जगजीत गुरुद्वारामध्ये गायन करतो. तो एका NGO ;च्या माध्यमातून पतियाळा गावात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आला होता.
भेट कशी झाली?
“मी पतियाळामध्ये मदतकार्यात गुंतलो होतो. त्यावेळी मला माझ्या आत्याने सांगितलं की, माझ्या आईच्या आई-वडिलांच म्हणजे आजोळ पतियाळामध्ये आहे. बोहारपूर गावात माझे आजी-आजोब राहत असावेत, असं ती बोलता-बोलता बोलून गेली” असं जगजीतने सांगितलं.
बोहारपूर गावात पोहोचल्यानंतर काय घडलं?
जगजीत बोहारपूर गावात पोहोचला व आजी प्रीतम कौर यांची भेट घेतली. “मी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली, त्यावेळी सुरुवातीला तिला संशय आला. पण माझ्या आईला हरजीतला पहिल्या लग्नापासून मुलगा असल्याच तिने सांगितलं. मला हे कळताच डोळ्यात अश्रू आले. मीच तो दुर्देवी मुलगा, जो त्याच्या आईला पाहू शकला नाही” असं जगजीत म्हणाला.
त्यानंतर आजीने जगजीतची आई हरजीत बरोबर भेट घालून दिली. इतक्या वर्षांनी परस्परांना पाहिल्यानंतर माय-लेकांनी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. एखाद्या चित्रपटात दाखवतात तसा हा प्रसंग होता.