Sidhu Moose Wala CCTV: पंजाबी गायक सिद्धूच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, गाडीचा पाठलाग आणि गोळ्यांच्या फायरिंगचा आवाज उघड
Sidhu Moose Wala CCTV: पंजाबी गायक सिद्धूच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात दोन कार सिद्धू मूसेवालाच्या गाडीचा पाठलाग करताना दिसत आहेत.
मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या हत्येनंतर देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धू मूसेवाला याची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी पंजाबच्या (Punjab) मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात 27 वर्षीय मूसेवालाचा मृत्यू झाला. सिद्धू त्याच्या जीपमधून जात असताना अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. पण मूसेवालाच्या हत्ये आधी नेमकं काय घडलं? ज्या लोकांनी मूसेवालाची हत्या केली ते आधीपासूनच त्याचा पाठलाग करत होते का असा प्रश्न अनेकांना पडला. त्याच संदर्भातलं एक सीसीटीव्ही फुटेज (Sidhu Moose Wala CCTV) आता समोर आलं आहे.
सीसीटीव्हीमध्ये काय?
सिद्धू मूसेवाला याच्या हत्येच्या काही मिनिटापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. यात दोन गाड्या सिद्धू मूसेवालाच्या गाडीचा पाठलाग करताना दिसत आहेत. पांढऱ्या रंगाची ही कार सिद्धू मूसेवालाच्या गाडीच्या मागे दिसतेय. ही कार सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सुरक्षेत कपात, दुसऱ्याच दिवशी हत्या…
पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आप सरकारने शनिवारीच सिद्धू मुसेवाला याची सुरक्षा कमी केली होती. मुसेवाला याच्याकडे आधी 8 ते 10 सुरक्षारक्षक होते. कालपासून सुरक्षा कमी केल्यानंतर मुसेवाला याच्या संरक्षणासाठी केवळ दोनच गनमॅन ठेवले होते. प्राथमिक माहितीनुसार मुसेवाला त्याच्या साथीदारांसह गाडीतून जात होता. त्यावेळी काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. घरापासून पाच किमी अंतरावर असतानाच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी मुसेवाला स्वत:च गाडी ड्राईव्ह करीत होता.
जीवाला धोका असल्याचे सिद्धूने वकिलांना सांगितलं
परवा सिद्धू मुसेवाला याने आपल्या वकिलांना फोन केला होता. त्यावेळी आपल्या जीवाला धोका आहे, असे त्याने वकिलांना सांगितले होते. पंजाब सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता आपली सुरक्षा कमी केल्याचेही त्याने सांगितले. आता सुरक्षेसाठी दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागेल असेही त्याने सांगितले होते.