विरोधकांवर संरक्षण मंत्र्यांची सडकून टीका; आरोपांना राजनाथ सिंह यांनी असे दिले उत्तर
What India Thinks Today | TV9 च्या WITT सत्ता संमेलनात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उभा करण्यापासून ते राम मंदिरापर्यंत अनेक मुद्यांवर संसदेत विरोधकांचे माईक बंद करण्यात येत असल्याच्या आरोपांवर त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला.
नवी दिल्ली | 27 February 2024 : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विरोधकांवर तुटून पडले. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. विरोधक सध्या प्रत्येक दिवशी कोणता न कोणता वाद उकरून काढत आहेत. राहुल गांधी स्वतःच घाबरलेले आहेत. त्यामुळेच ते निर्भय बनण्याचा नारा देत आहेत. आमचं सरकार कोणाला घाबरवत नाही. आमचं सरकार सर्वांना सोबत घेऊन चालणारं असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी कशामुळे घाबरले आहेत, ते समजत नसल्याचा चिमटा त्यांनी काढला. टीव्ही9 न्यूज नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी संरक्षण मंत्र्यांनी अनेक प्रश्नावर फ्रंटला येऊन तुफान फटकेबाजी केली.
हे भारत जोडो कशासाठी?
समजत नाही, भारत कुठून तुटलाय की राहुल गांधी त्याला जोडायला निघाले, असा चिमटा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढला. एका प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी राहुल गांधी यांचे आरोप पण फेटाळलेत, ज्यात राहुल गांधी यांनी त्यांना संसदेत बोलू दिल्या जात नसल्याचे म्हटले होते. राहुल गांधी स्वतःच बोलणं बंद करतात, कोणीही त्यांचा माईक बंद करत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
विरोधकांकडे मुद्यांचा अभाव
राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. आज विरोधकांकडे मुद्यांची अत्यंत कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र सिंह यांच्या नेतृ्त्वात देशाचा विकस होत आहे. जग सुद्धा हे मान्य करत आहे. त्यामुळे विरोधकांना कोणत्या मुद्यांवर विरोध करावा हे सूचत नसल्याचा पलटवार केला.
राम राज्य येण्यास सुरुवात
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राम मंदिर तयार होण्यासोबतच रामराज्याची सुरुवात झाल्याचे सांगितले. रामल्ला आता झोपडीतून राजवाड्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे देशात रामराज्य येण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.
समान नागरी कायदा
राजनाथ सिंह यांनी समान नागरिक कायद्यावर मोठे भाष्य केले. समान नागरिक कायदा हा जनसंघाच्या काळापासून जाहीरनाम्याचा भाग होता. उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा आला आहे. भविष्यात देशाला गरज असेल तर तो येईल. आमचा पक्ष आणि आमचे सरकार जाती आणि धर्माचे राजकारण करत नाही. सर्वांची सोबत आणि सर्वांचा विकास यावर हे सरकारचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर
राजनाथ सिंह यांनी सांगितले की वर्ष 2014 नंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरते आधारे मैलाचा दगड गाठला आहे. ही प्रगती विरोधकांच्या पचनी पडत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 10 वर्षांपूर्वी भारत अनेक वस्तूंची आयात करत होता. पण आज त्याच क्षेत्रात भारत वस्तू निर्यात करत आहे. भारत टॉप 25 निर्यातदारांमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.