रेल्वेच्या एसी – 3 कोचचा प्रवास स्वस्त झाला, रिझर्व्हेशन करणाऱ्यांचे पैसे रिर्टन मिळणार
ऐन उन्हाळी गर्दीचा हंगाम सुरू होण्याच्या मुर्हूतावर रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वेच्या एसी थ्री क्लासचा प्रवास स्वस्त झाला आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून एसी – 3 इकॉनॉमी कोचचे (AC 3 Economy Coach ) भाडे रेल्वेने कमी केले आहे. त्यामुळे गर्दीच्या ऐन उन्हाळ्याच्या सीझनमध्ये रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एसी – 3 इकॉनॉमी क्लासने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाचे सर्क्यूलर मंगळवारी काढले आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी रिझर्व्हेशन केले आहे त्यांनाही त्यांचा रिफंड दिला जाणार आहे.
रेल्वे बोर्डाने गेल्यावर्षी एसी इकॉनॉमी क्लासच्या भाड्यात वाढ केली होती. परंतू आता रेल्वेने आपली जुनी भाडे रचनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसी – 3 इकॉनॉमी क्लासचे भाडे आता सामान्य एसी – 3 क्लासच्या भाड्यापेक्षा कमी होणार आहे. रेल्वे बोर्डाचा हा निर्णय आजपासून ( बुधवार ) लागू होणार आहे. या नव्या निर्णयामुळे ज्या प्रवाशांनी ऑनलाईन किंवा तिकीट काऊंटरवरून तिकीटांचे आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांना त्यांचे उर्वरीत पैसे परत मिळणार आहेत.
एसी – 3 इकॉनॉमी क्लास म्हणजे काय ?
रेल्वेच्या एसी – 3 क्लासचे भाडे स्लीपर क्लासच्या भाड्याहून अडीच ते तीन पट जास्त असते. प्रवाशांना कमी खर्चात एसीचा प्रवास घडविण्यासाठी रेल्वेने अलिकडे एसी – 3 इकॉनॉमी क्लासचा पर्याय शोधून काढला आहे. या डब्यातील आसनाची रचना थोड्या आखुड पद्धतीची असल्याने त्यात जास्त प्रवासी सामावले जातात. एसी – 3 इकॉनॉमी कोचमध्ये बर्थची संख्या 80 असतेय तर सामान्य एसी – 3 कोचमध्ये केवळ 72 आसने ( बर्थ ) असतात. असे असले तरी या एसी – 3 इकॉनॉमी क्लासमध्येही चादर आणि उशा पुरवल्या जात असतात.
एक वर्षांपासून समान होते भाडे
रेल्वे बोर्डाने गेल्यावर्षी एक कमर्शियल सर्क्यूलर जारी केले होते, त्यानूसार एसी – 3 इकॉनॉमी क्लास आणि सामान्य एसी – 3 क्लासचे भाडे एकसारखे केले होते. या नव्या एसी – 3 इकॉनॉमी क्लासमध्ये सुरूवातीला प्रवाशांना बिछाना पुरविला जात नव्हता. परंतू नंतर भाडे समान केल्यावर प्रवाशांना बिछाना पुरविण्यास सुरूवात झाली होती. 21 मार्च रोजी रेल्वे बोर्डाने एक सर्क्यूलर काढून पुन्हा जुनी भाडे रचना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसी – 3 इकॉनॉमी क्लासमधून आता पुन्हा स्वस्तात प्रवास करता येणार आहे.