Indian Railway News : भारतीय रेल्वे जनरल कोच संपविणार ? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की…
रेल्वे मंत्रालय पुन्हा अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांनी पदभार सांभाळतानाच येत्या काही वर्षांचा प्लान जाहीर केला आहे. रेल्वेच्या वाढत्या वेंटिग लिस्ट समस्येचा निपटारा करण्यासाठी काही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई – भारतीय रेल्वेने दररोज अडीच कोटी प्रवासी प्रवास करतात. आशियातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिले जाते. देशात 100 हून अधिक वंदेभारत ट्रेन धावत आहेत. परंतू देशात आजही सर्वाधिक लोक जनरल कोचमधून प्रवास करतात. या दरम्यान काही लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये एसीचे डबे वाढविले आहेत. त्यामुळे जनरल डब्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रश्न विचारण्यात आला की रेल्वे जनरल कोचची संख्या कमी केली जात आहेत ? त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले आहे…काय म्हणाले रेल्वेमंत्री…
रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या खात्यातील पुढील योजनांबद्दल मिडीयाशी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. रेल्वेमंत्री म्हणाले की जनरल कोच कमी केले जाणार नाहीत. देशात आता अमृतभारत ट्रेनचे प्रोडक्शन वाढविले जाणार आहे. अमृत भारत ट्रेन वंदेभारत ट्रेनच्या धर्तीची ट्रेन असून ती वातानुकूलित नाही. तिच्यात जनरल प्रवाशांना गृहीत धरुन तयार केली आहे. रेल्वेचा फोकस लो इन्कम प्रवासी आहेत. त्यांच्या फायद्यासाठी ‘अमृतभारत’ ट्रेनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
NDA चे सरकार पुन्हा स्थापन झाले आहे. एनडीएच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्रालय पुन्हा मिळाल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जनरल डब्यांच्या संख्येबद्दल खुलासा केला आहे. रेल्वे मंत्रालयाने ‘अमृत भारत’ नॉन एसी गाड्यांची संख्या वाढविण्याची योजना आखली आहे. त्यामुळे जनरल डब्यांची संख्या आपोआप वाढणार आहे. तीन हजार ट्रेन झाल्यानंतर वेटिंगची समस्या आपोआप संपणार आहे. परंतू हे होण्यासाठी साल 2032 पर्यंत वाट पाहावी लागणार असेही त्यांनी सांगितले.
बुलेट ट्रेन, वंदेभारत मेट्रो आणि इंटरसिटी ट्रेन
बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. 310 किमीचे बुलेट ट्रेनचे वायडक्ट तयार झाले आहेत. साल 2026 पर्यंत गुजरातच्या हद्दीत बिलीमोरा ते सुरत दरम्यान बुलेट ट्रेनची चाचणी घेतली जाऊ शकते असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. वंदेभारतचे स्लिपर व्हर्जन लवकरच रुळांवर येणार आहे. येत्या दोन महिन्यात वंदेभारतची स्लिपर व्हर्जन रुळांवर धावणार आहे. 250 ते 300 वंदेभारत साल 2029 च्या रुळांवर धावणार आहेत. स्लीपर आणि नॉन स्लीपर वंदेभारतची संख्या साल 2029 च्या आधी 300 होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंटरसिटी म्हणून वंदे मेट्रो धावणार
वंदेभारत मेट्रोच्या एका डब्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. तर वंदेभारतच्या एका डब्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. वंदे मेट्रो तयार झाली आहे. कपूरतला रेल कोच फॅक्टरीतून वंदेभारत मेट्रोचा रेक बनून तयार झाला आहे. आयसीएफ चेन्नई येथे देखील वंदेभारत मेट्रो तयार करण्याचे काम सुरु आहे.
टक्कर टाळण्यासाठ ‘कवच’ सिस्टीम
रेल्वे गाड्यांची टक्कर टाळण्यासाठी कवच सुरक्षा उपकरणाला भारतीय रेल्वेचे उपकरण म्हणून मान्यता मिळाली आहे. कवच सिस्टीम सध्या वंदेभारत ट्रेनला लावली आहे. ट्रेनमध्ये कवच सिस्टीम लावण्यापूर्वी ट्रॅक आणि स्टेशनवर डेटा सेंटर विकसित केले जाते. 6000 किलो मीटर परिसरात कवच सिस्टीम लावली आहे. 10 हजार किमीपर्यंत कवच यंत्रणा बसविण्याचे काम सुरु आहे.