Vande Bharat Sleeper : आली हो आली, वंदे भारतची स्लीपर कोच आली; या मार्गांवर चालविण्याची योजना
देशातील सर्वाधिक लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेस आता स्लिपर कोचमध्ये तयार झाली आहे. या स्लिपर कोच व्हर्जनमुळे आता रात्रीचा लांबचा प्रवास करता येणार आहे. वंदेभारत एक्सप्रेसच्या चेअर कार कोचला खूपच पसंती मिळाली आता स्लिपर कोच येणार असल्याने ही ट्रेन कुठे धावणार या विषयी उत्सुकता आहे.
देशाची पहीली सेमी हायस्पीड ट्रेन वंदेभारत एक्सप्रेस प्रचंड लोकप्रिय झाली आहे. स्पेनने त्यांच्या ट्रेनचे तंत्रज्ञान विकण्यास मनाई केल्याने भारताने ही ट्रेन देशी तंत्रज्ञान वापरुन चेन्नईच्या आयसीएफ कोच फॅक्टरीत अवघ्या काही महिन्यात तयार केली. त्यामुळे परदेशापेक्षा खूपच स्वस्तात ही ट्रेन तयार झाली. आता भारत अनेक देशांना ही ट्रेन विकत आहे. या ट्रेनचे चेअरकार मॉडेल यशस्वी झाले. आता या ट्रेन शयनयान म्हणजे स्लीपर कोच मॉडेल आता तयार झाले आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी वंदेभारतच्या स्लीपर कोच उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
वंदेभारत एक्सप्रेस येत्या 15 ऑगस्ट रोजी धावण्याची शक्यता आहे. ही स्लीपर कोच ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार याविषयी सर्वांमध्ये उत्सुकता कायम आहे. वंदेभारत ट्रेनचा स्लीपर कोच काचीगुडा-विशाखापट्टणम, काचीगुडा -तिरुपती, सिकंदराबाद-पुणे या सर्वाधिक व्यस्त मार्गावर चालविण्यात यावी असे रेल्वे अधिकाऱ्यांची इच्छा आहे. नवीन वंदेभारत एक्सप्रेसला 16 डबे आहेत. ही ट्रेन रात्रीच्या प्रवासासाठी असणार आहे. या ट्रेनमध्ये एसी आणि नॉन एसी स्लीपर कोच असतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे या ट्रेनचे तिकीट सर्वसामान्यांना देखील विकत घेता येईल असे म्हटले जात आहे.
वंदेभारतचा स्लीपरचा वेग किती
नवी वंदे भारत स्लीपर कोच कमाल 160 कि.मी. प्रति तास वेगाने धावणार आहे. या ट्रेनचे बाहेरील डिझाईन चेअर कार वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असणार आहे.या ट्रेनमध्ये एकूण 16 डब्यात प्रवाशांसाठी एकूण 823 बर्थ असतील. या ट्रेनमधील प्रवाशांना विमान प्रवासाच्या धर्तीवरील सुविधा देण्यात येईल. जेवण आणि पाणी मिळल्यासाठी खास पॅण्ट्री कार असेल. गंधरहीत शौचालय असणार आहे. या ट्रेनमध्ये साऊंड प्रुफ डबे असल्याने बाहेरील कोणताही आवाज आत येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना शांत झोप लागेल.
वंदे भारत मेट्रो शहरांना जोडणार
मुंबई ते पुणे, नागपूर, अमरावती, जालना, संभाजीनगर अशा जवळच्या शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत मेट्रो सेवा सुरू करणार आहे.या गाड्या कानपूर-लखनऊ, दिल्ली-मेरठ, मुंबई-लोणावळा, वाराणसी-प्रयागराज, पुरी-भुवनेश्वर आणि आग्रा-मथुरा दरम्यान धावण्याची शक्यता आहे. या वंदेभारत मेट्रोच्या प्रत्येक डब्यात 250 लोक सहज प्रवास करू शकतील असे सांगण्यात येत आहे. रेल्वे लवकरच वंदे भारत मेट्रोची चाचणी घेणार आहे.