केव्हा धावणार वंदेभारत स्लीपर कोच ? रेल्वेने दिली माहिती
वंदेभारत एक्सप्रेसने प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली असून लवकरच वंदेभारतचे स्लीपर प्रोटोटाईप तयार होणार आहे. तसेच महाराष्ट्राला लवकरच आणखी दोन वंदेभारत मिळणार आहेत.
मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : भारतीय रेल्वेने प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासाची सुविधा देण्यासाठी वंदेभारत एक्सप्रेसचे नेटवर्क वाढविण्याचे काम सुरु केले आहे. लवकरच रेल्वे वंदेभारत एक्सप्रेसची स्लीपर कोच आवृत्ती आणि वंदेभारत मेट्रो लॉंच करण्याची योजना आखत आहे. रेल्वे बोर्डाचे सचिव मिलिंद देऊस्कर यांनी गुरुवारी सांगितले की लवकरच रेल्वेच्या वंदेभारत स्लीपर कोच आणि वंदेभारत मेट्रोचे लॉंचिंग होणार आहे. तसेच लवकरच महाराष्ट्राला आणखी दोन वंदेभारत मिळण्याची शक्यता आहे.
भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड ( BEML ) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शंतनु रॉय यांनी सांगितले की जर सगळंकाही योजनेबरहुकूम झाले तर आम्ही या आर्थिक वर्षाअखेर वंदेभारत स्लीपर कोचच्या पहिल्या प्रोटोटाईपला ट्रॅकवर उतरवू शकतो. प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देणारा हा प्रोटोटाईप असणार आहे. बीईएमएल, चेन्नईची इंटीग्रल कोच फॅक्टरी आणि रेल्वे बोर्ड एकत्र येऊन ही पहिली वंदेभारत स्लीपर कोच तयार करीत आहे.
स्लीपर वंदेभारत 16 डब्यांची
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच सोशल मिडीयावर ‘ कॉन्सेप्ट ट्रेन-वंदे भारत ( Sleeper Coach Edition ) चे फोटो पोस्ट केले होते. प्रत्येक वंदेभारत एक्सप्रेस दर ताशी 160 किमी वेगाने धावण्याच्या क्षमतेची असणार आहे. वंदेभारत स्लीपर कोचला एकूण 16 डबे असणार असून त्या 887 प्रवासी क्षमतेच्या असणार आहेत.
कोल्हापूर आणि जालना मार्गावर वंदेभारत
वंदेभारत स्लीपर ट्रेन आधुनिक डीझाईन आणि तंत्रज्ञानाच्या असणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेनूसार त्या डीझाईन केलेल्या असणार आहेत. अधिक आरामदायी आसनाची रचना आणि क्लासिक लाकडाचे डीझाईन त्यात असणार आहे. कोचमध्ये फ्लोर लाईटनिंगची व्यवस्था आणि उच्च दर्जाची प्रकाशव्यवस्था असेल. पहिल्या वंदेभारत एक्सप्रेसचे उद्घाटन नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. महाराष्ट्रात लवकरच मुंबई ते कोल्हापूर आणि जालना मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस चालविण्याची योजना आहे.