राजस्थानात फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी!, कोरोना आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानात दिवाळीमध्ये फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात धूर ओकणाऱ्या गाड्यांवरही कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी गेहलोत यांना हा निर्णय घेतला आहे.
जयपूर: दिवाळीमध्ये सर्वत्र फटाक्यांची मोठी आतषबाजी केली जाते. पण राजस्थानात फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचं आवाहन गेहलोत यांनी जनतेला केलं आहे. (Rajasthan CM Ashok Gehlot ban on sale of firecrackers on the backdrop of corona )
“फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे कोरोनाचे रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहता, फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात धूर ओकणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
राजस्थानमध्ये ‘नो मास्क नो एन्ट्री’, ‘शुद्धतेसाठी युद्ध’ मोहीम
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अजून एक ट्वीट करत राजस्थानात दोन मोहिमांची घोषणा केली आहे. “कोरोना महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्यातील जनतेची सुरक्षा आम्हाला सर्वतोपरी आहे. बैठकीत ‘नो मास्क- नो एन्ट्री’ आणि ‘शुद्धतेसाठी युद्ध’ या दोन मोहिमांची माहिती घेतली, असं ट्वीट गेहलोत यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातही फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी येणार?
दिवाळी अगदी १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशावेळी राजस्थान सरकारनं फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सण-समारंभ अगदी साध्या पद्धतीनं साजरे करण्यात आले. नुकताच येऊन गेलेला नवरात्रोत्सवही राज्यात साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. मात्र महाराष्ट्रात दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फटाक्यांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतात का?, त्याचबरोबर ते जनतेला काय आवाहन करतात?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस 2021च्या मार्चनंतर येण्याची शक्यता, काय असेल किंमत?
कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने WHO चे प्रमुख होम क्वारन्टाईन
Rajasthan CM Ashok Gehlot ban on sale of firecrackers on the backdrop of corona