निवडणूक काँग्रेस अध्यक्षपदाची, पण नेतृत्त्व करायचंय विरोधी गटाचं..अशोक गेहलोतांचं भलतंच गणित..
राहुल गांधी अध्यक्ष पदासाठी तयार नसल्याचे जाहीर झाल्यानंतर अशोक गेहलोत यांच्याच नावाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
नवी दिल्लीः सध्या देशात काँग्रेस वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आली आहे. काँग्रेस अध्यक्ष पदावर (Congress President) कोण विराजमान होणार याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. या पदासाठी अनेक नावं चर्चेत आली आहेत, मात्र अशोक गेहलोतांनी अध्यक्षपदासाठी मोठी मोर्चेबांधणी केली असून त्यांचेच नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Election 2022) लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी जाहीरच करुन टाकलं आहे.
या निवडणुकांबाबत मी लवकरच अर्ज दाखल करण्याची तारीखही जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेस अध्यक्ष पद फक्त विरोधी पक्ष बळकट करण्यासाठी मला ही निवडणूक गरजेची असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना आता जाहीर झाली आहे. 24 ते 30 सप्टेंबर या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एका उमेदवारपेक्षा अधिक उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये अशोक गेहलोत यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर एक पद, एक व्यक्ती अशी काँग्रेसमधून घोषणा केली होती, तर राहुल गांधींनीही एकाच वेळी दोन पदे भूषविता येणार नाही याचे संकेत यापूर्वीच दिले होते.
त्यामुळे अशोक गेहलोत अध्यक्ष पदासाठी नक्की झालेच तर मात्र सचिन पायलट यांना महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुढे आले असले तरी त्याआधी राहुल गांधींनी अध्यक्ष पद स्वीकारावे म्हणून विविध राज्यातील काँग्रेसने ठरावही पास करुन दिले होते.
मात्र राहुल गांधी अध्यक्ष पदासाठी तयार नसल्याचे जाहीर झाल्यानंतर अशोक गेहलोत यांच्याच नावाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधीनी जाहीर केले होते की, काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कोणीही लढवू शकते आणि आता होणार अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचाच असेल असंही त्यांनी जाहीर केले होते.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेअंतर्गत सध्या राहुल गांधी वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत आहेत. राहुल गांधी यांचे संपूर्ण लक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर आहे. तरीही काही नेते मात्र अध्यक्ष पदासाठी पुढे सरसावले आहेत.
अशोक गेहलोत यांचे नाव जसे चर्चेत आले आहे तसेच खासदार शशी थरूर यांचेही नाव समोर आले होते. शशी थरुर यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडून एनओसी ना हरकत प्रमाणपत्रही घेतले होते.