राजीव गांधी यांनी त्याला पाहिले, गाडी सोडली, केला पायी प्रवास, कोण होती ती व्यक्ती?
राजीव गांधी हे खुल्या जीपमधून पुढे प्रवास करणार होते. मात्र, त्या जीपमध्ये त्यांनी एका व्यक्तीला पाहिले. गाडीमध्ये त्या व्यक्तीला पाहून ते तडक खाली उतरले आणि त्यांनी पायी प्रवास सुरु केला. त्याच्या अशा वागण्याचे कारण नेत्यानांही कळले नाही.
नवी दिल्ली : 1989 मध्ये लोकसभा निवडणुक झाली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. त्यामुळे राजीव गांधी यांनी कॉंग्रेसला पुन्हा जनाधार मिळवून देण्यासाठी 1990 मध्ये सद्भावना यात्रा काढली. फैजापूर येथे सद्भावना यात्रेसाठी राजीव गांधी पोहोचले. चार्टर्ड विमानातून एअर स्ट्रीपवर उतरले. यापुढे गाडीतून रोड शो करून पुढे राजीव गांधी अयोध्येला जाणार होते. फैजाबादचे माजी खासदार निर्मल खत्री आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. सद्भावना यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. राजीव गांधी हे खुल्या जीपमधून पुढे प्रवास करणार होते. मात्र, त्या जीपमध्ये त्यांनी एका व्यक्तीला पाहिले. गाडीमध्ये त्या व्यक्तीला पाहून ते तडक खाली उतरले आणि त्यांनी पायी प्रवास सुरु केला. त्याच्या अशा वागण्याचे कारण नेत्यानांही कळले नाही. मात्र, कारण कळले तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला गाडीतून खाली उतरविले. त्यानंतरच राजीव गांधी यांनी गाडीतून रोड शो केला.
1989 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवनंतर कॉंग्रेस नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले होते. मात्र, राजीव गांधी यांनी पक्षाच्या पराभवाची कारणे जाणून घेत भारत यात्रा काढण्याचे ठरविले. भारत यात्रेच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क कार्यक्रम हाती घेतला. 1990 मध्ये राजीव गांधी यांनी विविध मार्गांनी भारताचा प्रवास केला. पदयात्रा काढल्या. एक सामान्य प्रवास होऊन गाडीतून प्रवास केला. 19 ऑक्टोबर 1990 रोजी राजीव गांधी यांनी हैदराबादमधील चारमिनार येथून सद्भावना यात्रा सुरू केली होती.
सद्भावना यात्रेचा पुढचा टप्पा फैजापूर होता. याच यात्रेत घडलेला हा प्रसंग… कॉंग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने उत्साही कार्यकर्ते जमा झाले होते. राजीव गांधी यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा लांबलचक ताफा तयार झाला होता. त्या ताफ्यासह अयोध्येच्या दिशेने जाण्यासाठी सजविण्यात आलेल्या गाडीत ते बसणार. इतक्यात त्यांना त्या गाडीत एक व्यक्ती दिसली. ती व्यक्ती होती पूर्वांचलचे काँग्रेस आमदार. राजीव गांधी यांनी त्या आमदाराला गाडीत पहिले आणि त्यांनी पायी प्रवास करण्याचे ठरवले. त्याचे कारण म्हणजे तो पूर्वांचलचा आमदार हा एक बडा माफिया होता.
कॉंग्रेसची उमेदवारी देताना राजीव गांधी यांना ही गोष्ट माहित नव्हती. पण जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत असलेला संपर्क तोडून टाकला. त्याच बड्या माफियाला स्वत:च्या वाहनात पाहून ते खाली उतरले आणि कार्यकर्त्यासह ते पायी चालायला लागले. त्या कॉंग्रेस आमदारांचे नाव होते हरिशंकर तिवारी.
राजीव गांधी नाराज झाल्याची चर्चा सुरु झाली. सुमारे दोन किलोमीटर ते पायी चालत राहिले. तोपर्यंत पक्षातील अन्य बड्या नेत्यांना त्यांच्या नाराजीचे कारण कळले होते. अन्य नेत्यांनी राजीव गांधी यांना खूप समजावून सांगितले. अखेर, राजीव गांधी गाडीत बसण्यास राजी झाले. पण, त्या आमदाराला मात्र गाडीतून खाली उतरावे लागले. इतकेच नव्हे तर राजीव गांधी यांच्या जवळपास त्याने कुठेही दिसू नये, अशी सक्त सूचनाही त्या आमदारांना करण्यात आली.
राजीव गांधी यांना खुल्या जीपमधून प्रवास करताना पाहण्यासाठी लोकांची खूप मोठी गर्दी जमली होती. अयोध्येतील नया घाटावर राजीव गांधी पोहोचले तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. त्याचा परिणाम असा झाला की त्यांना हनुमानगढी येथील दर्शनाचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. कारण, त्यावेळी कमी प्रकाशामुळे विमानाला हवाई पट्टीवरून उड्डाण करण्याची परवानगी नव्हती.