Ram Mandir : देवाला तरी घाबरा! अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टला देणगीसाठी दिलेले तब्बल 2 हजार चेक बाऊन्स
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी एकूण 3 हजार 400 कोटी रुपयांचा निधी गोळा झालाय.
अयोध्या : अयोध्येच्या राम मंदिरासाठी (Ayodhya Ram Mandir) देणगीखातर दिलेले तब्बल 2 हजार चेक (Cheque) बाऊन्स झाले आहेत. अनेकांनी चेकच्या माध्यमातून आपली देणगी राम मंदिर ट्रस्टकडे (Ram Mandir Trust) जमा केली होती. मात्र जमा करण्यात आलेल्या चेक स्वरुपातली बहुतांश देणगीवर आता सवाल उपस्थित झाले आहे. भाजपासोबत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मंदिरासाठी देणगी गोळा केलेली. काहींनी रोख रक्कम देणगी स्वरुपात दिली होती. तर काहींनी चेक स्वरुपात देणगी देणं पसंत केलं होतं. मात्र चेक दिलेल्या हजारो देणगीदारांपैकी तब्बल 2000 देणगीदारांचे चेक बाऊन्स झाल्यानं खळबळ उडालीय. विश्व हिंदू परिषदेच्या अहवालामधून ही धक्कादायक माहिती समोर आलीय.
काय आहे आकडेवारी?
विश्व हिंदू परिषदेनं दिलेल्या अहवालातून अयोध्येतील राम मंदिरासाठी सुरु असलेल्या कामाच्या जमाखर्चाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात दोन हजार चेक बाऊन्स झाल्याचं ससोर आलंय. राम मंदिरासाठी एकूण 3 हजार 400 कोटी रुपयांचा निधी गोळा झालाय. पण मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या चेक स्वरुपातला निधी हा प्रत्यक्षात मिळालाच नसल्याचंही अहवालातून स्पष्ट झालंय.
थोडक्यात पण महत्त्वाचं :
- एकूण 3,400 कोटी रुपये निधी जमा
- चेक स्वरुपातील 22 कोटींचा निधा जमा होणार होता
- पण तब्बल 2 हजार चेक बाऊन्स झाल्यानं कोट्यवधींचा चुना
- विश्व हिंदू परिषदेच्या अहवालातून माहिती उघड
दोन हजार चेकच्या माध्यमातून एकूण बावीस कोटी रुपयांची देणगी गोळा करण्यात आली होती. पण चेक बाऊन्स झाल्यानं राम मंदिर ट्रस्टला बावीस कोटी रुपयांचा चुना लागल्याची चर्चा आता रंगली आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिराचं काम सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येतील राम मंदिराचा मार्गही मोकळा झाला होता. या मंदिराच्या कामाची पायाभरणीही करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या कामाला हातभार लावण्यासाठी देशभरातून निधी गोळा करण्यात आला होता. यापैकी चेक स्वरुपात जमा झालेला निधी बाऊन्स झाल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय.
विशेष म्हणजे राम मंदिराच्या जमीन व्यवहारातही घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. आप खासदार संजय सिंह यांनी याबाबत आरोप केला होता. राम जन्मभूमी ट्रस्टचे चंपत राय यांनी दोन कोटीची जमीन 18 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला. यावरुही बराच वाद झाला होता. त्यानंतर ट्रस्टच्या वतीने हे आरोप फेटाळण्यात आले होते.